PM Narendra Modi on Pakistan : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजस्थानमधील बिकानेरमध्ये एका जाहीर सभेला संबोधित करताना ते म्हणाले की, 22 एप्रिल रोजी आपल्या माता बहिणींचा धर्म विचारुन त्यांचा सिंदूर हिसकावण्यात आला. त्या घटनेनंतर 140 कोटी देशवासीयांनी दहशतवाद मुळापासून उखडून टाकण्याचा संकल्प केला होता. आमच्या सरकारने तिन्ही दलांना पूर्ण स्वातंत्र्य दिले अन् सैन्यांनी मिळून पाकिस्तानला शरणागती पत्करण्यास भाग पाडले. माझ्या नसांमध्ये रक्त नाही तर गरम सिंदूर वाहत आहे. आता पाकिस्तानसोबत ना व्यापार होणार, ना चर्चा. प्रत्येक दहशतवादी हल्ल्याची किंमत त्याला चुकवावी लागेल, असेही मोदी म्हणाले.
22 एप्रिलच्या हल्ल्याला 22 मिनिटांत उत्तर पंतप्रधान मोदी पुढे म्हणतात, 22 तारखेला झालेल्या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारतीय सैन्याने 22 मिनिटांत दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले. जेव्हा सिंदूरचे स्फोटके होतात, तेव्हा काय होते ते सर्वांनी पाहिले. मी माझ्या देशवासियांना सांगू इच्छितो की, जे लोक सिंदूर पुसण्यासाठी बाहेर पडले होते, ते धुळीत मिसळले गेले आहेत. भारतात सांडलेल्या रक्ताच्या प्रत्येक थेंबाचा बदला घेण्यात आला आहे, असेही ते म्हणाले.
अणुबॉम्बची धमकी...पाकिस्तानला इशारा देताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, दहशतवादाचा पोशिंदा पाकिस्तानचा खरा चेहरा संपूर्ण जगाला दाखवला जाईल. पाकिस्तान कधीही भारताविरुद्ध थेट युद्ध जिंकू शकत नाही. जेव्हा जेव्हा लढायला आला, त्याला नेहमीच पराभवाचा सामना करावा लागला. आता पाकस्तानची अणुबॉम्बची धमकीही काम करणार नाही. पाकिस्तानला भारताचा हक्काचा पाणी वाटाही मिळणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.