मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या 'मन की बात'वर पुन्हा एकदा डिसलाईक्सचा पाऊस पडला आहे. काल दसऱ्याच्या निमित्तानं मोदींनी देशवासीयांशी संवाद साधला. कोरोनाचं संकट असल्यानं सणासुदीच्या काळात काळजी घ्या. सीमेवर देशाचं संरक्षण करणाऱ्या जवानांसाठी दिवाळीत एक दिवा लावा, स्थानिक उत्पादनं खरेदी करा, लोकलसाठी व्होकल व्हा, असं आवाहन त्यांनी देशवासीयांना केलं. मात्र मोदींच्या संबोधनावर नेटकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. भाजप आणि पंतप्रधान कार्यालयाच्या अधिकृत यूट्यूब चॅनल पाहिल्यास याची प्रचिती येते.

काल सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनीमन की बातमधून देशवासीयांशी संवाद साधला. आज सकाळी १० पर्यंत पीएमओ इंडियाच्या यूट्यूबवर ४६ हजारांहून अधिक जणांनी मोदींचा व्हिडीओ पाहिला. या व्हिडीओला आतापर्यंत साडे तीन हजारांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. तर डिसलाईक्सची संख्या चार हजारांपेक्षा अधिक आहे. विशेष म्हणजे या व्हिडीओवरील कमेंट सेक्शन बंद करण्यात आलं आहे. त्यामुळे व्हिडीओ लाईक/डिसलाईक्स करण्यामागची कारणं समजू शकलेली नाहीत.भारतीय जनता पक्षाच्या अधिकृत यूट्यूब चॅनलवर आतापर्यंत ९६ हजारांहून अधिक जणांनी पंतप्रधान मोदींची मन की बात पाहिली. या व्हिडीओला साडे पाच हजार जणांनी लाईक केलं आहे. तर साडे आठ हजारांपेक्षा अधिक जणांनी व्हिडीओ डिसलाईक केला आहे.भाजपनं यूट्यूब चॅनलवरील कमेंट सेक्शन सुरू ठेवलं आहे. या कमेंट सेक्शनवर नजर टाकल्यास अनेकांनी कोरोना संकट, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बिहारमध्ये देण्यात आलेलं मोफत कोरोना लसीचं आश्वासन, शेतकऱ्यांच्या समस्या, रोजगार हा मुद्द्यांचा उल्लेख केला आहे.मन की बातमध्ये काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
सणासुदीआधी, सणासुदीच्या दिवसांत लोक खरेदी करतात. त्यावेळी स्थानिक आणि स्वदेशी वस्तू खरेदी करा, असं मोदी म्हणाले. यावेळी पंतप्रधानांनी जवानांनाही विजयादशमीच्या शुभेच्छा दिल्या. आपल्या सुरक्षेसाठी स्वत:चा जीव धोक्यात घालून सीमेवर उभ्या असलेल्या जवानांसाठी आपण यंदाच्या दिवाळीत एक दिवा लावू, असं आवाहन त्यांनी केलं. सणासुदीच्या दिवसांत फिजिकल डिस्टन्सिंगचं पालन करा, असंही मोदींनी सांगितलं.

आपण सण साजरे करताना आपले शूर सैनिक देशाच्या सीमेवर तैनात आहेत. भारत मातेच्या सेवेसाठी आणि सुरक्षेसाठी ते कटिबद्ध आहेत. आपण सण साजरे करत असताना त्यांची आठवण जरूर ठेवावी. भारत मातेसाठी सीमेवर डोळ्यात तेल घालून पहारा देणाऱ्या जवानांसाठी आपण यंदाच्या दिवाळीत एक दिवा प्रज्वलित करू. मी जवानांना सांगू इच्छितो की तुम्ही भलेही सीमेवर असाल. पण संपूर्ण देश तुमच्यासोबत आहे. तुम्ही कायम सुरक्षित राहावं, हीच आमची प्रार्थना आहे. ज्यांनी आपल्या कुटुंबातील सदस्यांनी सीमेवर देशाच्या संरक्षणासाठी पाठवलं, त्यांना मी नमन करतो, अशा शब्दांत मोदींनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या.

मोदींनी 'मन की बात'मध्ये खादीचा विशेष उल्लेख केला. 'खादी आपल्या साधेपणाची ओळख आहे. आज खादी इको फ्रेंडली रुपातही ओळखली जाते. याशिवाय ती शरीरासाठीही चांगली आहे,' असं मोदी म्हणाले. यावेळी पंतप्रधानांनी सातासमुद्रापार गेलेल्या खादीची गोष्ट सांगितली. 'मेक्सिको देशात ओहाका नावाचं एक शहर आहे. तिथली खादी ओहाका खादी नावानं ओखळली जाते. मार्क ब्राऊन नावाच्या एका तरुणावर गांधींचा इतका प्रभाव पडला की त्यानं मेक्सिकोला जाऊन खादीचं काम सुरू केलं,' असं मोदी म्हणाले.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: pm narendra modi man ki baat gets more dislikes than likes on bjp youtube channel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.