नवी दिल्ली : पंतप्रधाननरेंद्र मोदी यांनी नवे सरकार स्थापन करण्यापूर्वी पंतप्रधान कार्यालयातील (PMO) कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. यावेळी नरेंद्र मोदी यांनी माझ्या अपेक्षांपेक्षा तुमची कामगिरी उत्तम असल्याचे सांगत कार्यालयातील कर्मचाऱ्यांचे कौतुक केले.
आपली स्वप्ने कितीही सुंदर असली, संकल्प कितीही दृढ असला आणि हेतू कितीही चांगला असला तरी समर्पित टीम नसेल तर अपेक्षित यश मिळणे अत्यंत कठीण असते. पाच वर्षात अखंड एकनिष्ठ साधना, ज्याचे लक्ष देशातील सामान्य व्यक्तीच्या जीवनात आशा आणि बदल करणे. या सर्व कामांचे क्रेडिट तर पंतप्रधान कार्यालयाला जाते, असे नरेंद्र मोदी म्हणाले.
याचबरोबर, गेल्या पाच वर्षात 2014 ते 2019 दरम्यान आम्ही आपल्या कामात कधीही अडथळा आणला नाही. लोकांच्या अपेक्षेमुळे आणि विश्वासामुळे कामाचा तणाव वाढतो. पण, ताकद सुद्धा वाढते. या विश्वासामुळेच वाढलेले काम ओझे न वाटता त्याचे ऊर्जेत रूपांतर झाले. त्या ऊर्जेने अधिक काम करण्याचे, निर्णय घेण्याचे बळ दिले. या संपूर्ण प्रवासात आपण सर्वांनी माझ्या अपेक्षेपेक्षा जास्त काम केले. मला एकटे पडू दिले नाही, असेही नरेंद्र मोदी यांनी सांगितले.
काल शुक्रवारी नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील केंद्रीय मंत्रिमंडळाची सायंकाळी बैठक झाली. या बैठकीत सध्याची 16वी लोकसभा विसर्जित करण्याचा आणि नरेंद्र मोदी यांच्या आभाराचा, असे दोन प्रस्ताव पारित करण्यात आले. या बैठकीनंतर नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्रिमंडळाने राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे आपले राजीनामे सुपूर्द केले. त्यानंतर राष्ट्रपतींनी सुद्धा त्यांचे राजीनामे स्वीकारले आहेत.
दरम्यान, लोकसभा निवडणुकीत अभूतपूर्व विजय मिळाल्यानंतर राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारच्या दुसऱ्या इनिंग्जची जय्यत तयारी सुरू झाली असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा शपथविधी बहुधा येत्या गुरुवारी 30 मे रोजी होण्याची शक्यता आहे.
Web Title: PM Narendra Modi interacts with PMO staff
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.