'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2025 19:18 IST2025-09-22T19:16:34+5:302025-09-22T19:18:38+5:30

PM Narendra Modi GST 2.0 : आजपासून नवीन जीएसटी सुधारणा देशभरात लागू झाल्या आहेत.

PM Narendra Modi GST 2.0: PM Modi's letter to the nation regarding GST 2.0 | 'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र

'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र

PM Narendra Modi GST 2.0 : केंद्र सरकारने वस्तू व सेवा कर, म्हणजेच जीएसटी व्यवस्थेत मोठा बदल करत 'GST 2.0' सोमवारपासून(22 सप्टेंबर) देशभर लागू केला आहे. नव्या व्यवस्थेनुसार दैनंदिन गरजेच्या वस्तूंना 5% करस्लॅबमध्ये ठेवण्यात आले आहे, तर विलासी वस्तूंवर आणि आरोग्यास हानिकारक उत्पादनांवर अनुक्रमे 18% आणि 40% कर आकारला जाणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल(दि.21) जीएसटी सुधारणांबाबत देशाला संबोधित केले. त्यानंतर आता आज देशाच्या नावे एक पत्र लिहिले आहे. X वर केलेल्या पोस्टमध्ये त्यांनी या नवीन बदलाला “जीएसटी बचत महोत्सव” म्हटले. आपल्या पत्रात मोदी म्हणतात, "नवरात्रीच्या तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला शुभेच्छा. मी प्रार्थना करतो की हा सण तुम्हा सर्वांना आनंद आणि समृद्धी घेऊन येवो. यंदाची नवरात्र विशेष आहे. या नवीन जीएसटी सुधारांमुळे स्वदेशी उत्पादनांना चालना मिळेल आणि आत्मनिर्भर भारताच्या दिशेने मोठे पाऊल उचलले जाईल." 

आरोग्य विम्यावरील कर शून्य

पीएम मोदी पुढे म्हणाले की, "नव्या सुधारांनुसार प्रामुख्याने फक्त दोनच स्लॅब राहतील. अन्नधान्य, औषधे, साबण, टूथपेस्ट यांसारख्या दैनंदिन वस्तूंना शून्य किंवा 5% जीएसटी लागेल. घर बांधणे, गाडी खरेदी करणे, हॉटेलमध्ये जेवणे किंवा प्रवासदेखील आता पूर्वीपेक्षा स्वस्त होईल. विशेष म्हणजे, आरोग्य विम्यावरील जीएसटी पूर्णपणे रद्द करण्यात आले आहे."

कररचनेत मोठा दिलासा

"2017 मध्ये जीएसटी आल्याने देशाला करांच्या गुंतागुंतीतून मुक्तता मिळाली होती. आता या नेक्स्ट जनरेशन सुधारांमुळे दुकानदार, लघुउद्योग यांना अधिक सुविधा मिळतील. मला पाहून आनंद झाला की, अनेक दुकानदार आणि व्यापारी Before आणि After असे बोर्ड लावून, कोणते सामान किती स्वस्त झाले, हे ग्राहकांना सांगत आहे. 12 लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर आता आयकर आकारला जाणार नाही. इनकम टॅक्समधील सवलत आणि जीएसटी सुधारणा एकत्रित पाहिल्यास नागरिकांचे दरवर्षी सुमारे 2.5 लाख कोटी रुपये वाचतील. नागरिक देवो भव, हाच आमचा मंत्र आहे."

स्वदेशीला प्राधान्य द्या

पीएम मोदींनी देशवासियांना आवाहन केले की, "आत्मनिर्भरतेसाठी आपण स्वदेशीला आपल्या जीवनाचा भाग बनवले पाहिजे. ब्रँड किंवा कंपनी कोणतीही असो, जर त्यात भारतीय कारागीरांचा घाम असेल, तर ते स्वदेशी उत्पादन आहे. जेव्हा जेव्हा तुम्ही आपल्या देशातील कारागीर, कामगार आणि उद्योगांनी बनवलेल्या वस्तू खरेदी करता, तेव्हा तुम्ही अनेक कुटुंबांच्या उपजीविकेला आधार देता आणि देशातील तरुणांसाठी रोजगार निर्माण करता. दुकानदारांनीही स्वदेशीला प्रोत्साहन द्यावे. आपण सगळ्यांनी गर्वाने सांगावे, हे स्वदेशी आहे. तुमच्या घरातील बचत वाढो, तुमची स्वप्ने सत्यात उतरो, अशी प्रार्थना करतो," अशा शुभेच्छा पीएम मोदींनी आपल्या पत्रातून दिल्या.

Web Title: PM Narendra Modi GST 2.0: PM Modi's letter to the nation regarding GST 2.0

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.