नवी दिल्ली - अमेरिकेचे राष्ट्रपती ज्यो बायडन आणि त्यांच्या कुटुंबाला २०२३ साली परदेशी नेत्यांकडून हजारो डॉलर किंमतीच्या भेटवस्तू मिळाल्या होत्या. त्यातील बायडन यांना भारताकडून सर्वात महागडं गिफ्ट देण्यात आलं. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून बायडन यांच्या पत्नीसाठी तब्बल २० हजार अमेरिकन डॉलर किंमतीचा हिरा भेट म्हणून देण्यात आला होता. अमेरिकेची फर्स्ट लेडी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल बायडन यांना २०२३ साली भारतीय चलनानुसार १७ लाख किंमतीचा डायमंड भेट म्हणून दिला गेला.
भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून ७.५ कॅरेटचा हिरा २०२३ साली बायडन कुटुंबाला भेट करण्यात आला. भारतापाठोपाठ युक्रेनकडून १४,०६३ अमेरिकन डॉलरचा ब्रोच आणि मिस्त्रचे राष्ट्रपती ४५१० अमेरिकन डॉलर किंमतीचे एक ब्रेसलेट, फोटो अल्बम भेट म्हणून बायडन कुटुंबाला मिळालं होते. अमेरिकेच्या परराष्ट्र खात्याकडून प्रकाशित वार्षिक रिपोर्टमध्ये याची माहिती देण्यात आली आहे. स्टेट डिपार्टमेंटच्या एका डॉक्युमेंटनुसार, २० हजार अमेरिकन डॉलरचा हिरा व्हाइट हाऊसच्या ईस्ट विंगच्या खोलीत ठेवण्यात आला आहे. ज्यो बायडन यांना अनेक मौल्यवान भेटवस्तू मिळाल्या. त्यात दक्षिण कोरियाच्या गिफ्टचाही समावेश आहे. राष्ट्रपती सुक येओलने १७ हजार अमेरिकन डॉलर किंमतीचा फोटो अल्बम भेट दिला.
दरम्यान, मंगोलियाई पंतप्रधानाकडून ३४९५ अमेरिकन डॉलर किंमतीच्या मंगोल योद्धा मूर्ती, ब्रुनईचे सुल्तान यांनी ३३०० अमेरिकन डॉलर किंमतीची चांदीची वाटी, इस्त्रायलच्या राष्ट्रपतींकडून ३१६० अमेरिकन डॉलर किंमतीचा चांदीचा ट्रे यांचाही भेटवस्तूत समावेश आहे. २४०० अमेरिकन डॉलर किंमतीचे कोलाज युक्रेनचे अध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी भेट दिला. फेडरल कायद्यानुसार कार्यकारी शाखेच्या अधिकाऱ्यांना परदेशी नेते आणि पाहुण्यांकडून मिळालेल्या भेटवस्तू घोषित करणे आवश्यक आहे ज्यांचे अंदाजे मूल्य ४८० अमेरिकन डॉलरपेक्षा जास्त आहे.