SCO परिषदेत नरेंद्र मोदी आणि जिनपिंग यांची होऊ शकते भेट; भारत-चीन संबंधांवर चर्चा होणार?
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2022 20:09 IST2022-09-11T20:08:15+5:302022-09-11T20:09:00+5:30
SCO : पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याबाबत माहिती देताना परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले की, परिषदेत सहभागी होण्याव्यतिरिक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी काही द्विपक्षीय बैठकाही घेणार आहेत.

SCO परिषदेत नरेंद्र मोदी आणि जिनपिंग यांची होऊ शकते भेट; भारत-चीन संबंधांवर चर्चा होणार?
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढील आठवड्यात उझबेकिस्तानमध्ये होणाऱ्या शांघाय सहकार्य संघटना (SCO) शिखर परिषदेत सहभागी होणार आहेत. पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याबाबत माहिती देताना परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले की, परिषदेत सहभागी होण्याव्यतिरिक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी काही द्विपक्षीय बैठकाही घेणार आहेत. त्यामुळे आता भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्या संभाव्य भेटीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, जर दोन्ही नेत्यांमध्ये परस्पर बैठक आणि द्विपक्षीय चर्चा झाली, तर एलएसी वादानंतर दोन्ही नेते समोरासमोर आणि चर्चा करण्याची ही पहिलीच वेळ असणार आहे. नरेंद्र मोदी आणि शी जिनपिंग यांच्यातील संभाव्य चर्चेमुळे भारत-चीन संबंधांमधील तणाव कमी होण्यास मदत होईल, अशी शक्यता वर्तविली जात आहे.
या परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदींशिवाय रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन, चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग, पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्यासह इतर सदस्य देशांचे प्रमुखही सहभागी होणार आहेत. उझबेकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष शवकत मिर्जियोयेव यांच्या निमंत्रणावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी समरकंद येथे होणाऱ्या शांघाय सहकार्य संघटनेच्या बैठकीत सहभागी होणार आहेत. शांघाय सहकार्य संघटना शिखर परिषद 15-16 सप्टेंबर रोजी होणार आहे.
या मुद्द्यांवरही चर्चा होणार
शांघाय सहकार्य संघटना (SCO) शिखर परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सहभागाची घोषणा करताना परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले की, गेल्या दोन दशकांतील कामाचा आढावा घेण्यासोबतच भविष्यातील बहुपक्षीय सहकार्यावरही शांघाय सहकार्य संघटना शिखर परिषदेदरम्यान चर्चा केली जाईल. या बैठकीत प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय महत्त्वाच्या मुद्द्यांवरही चर्चा होणार आहे.