पंतप्रधान मोदींनी ओमानमध्ये कानातले घातले? व्हायरल व्हिडिओमागचे सत्य आले समोर; जाणून घ्या नेमका प्रकार काय!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2025 13:09 IST2025-12-19T13:07:47+5:302025-12-19T13:09:14+5:30
PM Modi Oman Visit: ओमानमध्ये पंतप्रधान मोदींच्या कानात काहीतरी चमकताना दिसल्याने सोशल मीडियावर चर्चेला उधाण आले आहे. हा व्हिडिओ खरा आहे की केवळ भ्रम? वाचा सविस्तर माहिती.

पंतप्रधान मोदींनी ओमानमध्ये कानातले घातले? व्हायरल व्हिडिओमागचे सत्य आले समोर; जाणून घ्या नेमका प्रकार काय!
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ओमान दौऱ्यातील एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वाऱ्यासारखा व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये पंतप्रधान मोदींच्या कानात काहीतरी चमकताना दिसत आहे, ज्यामुळे नेटिझन्समध्ये त्यांनी 'कानातले' घातले आहेत की काय? अशी चर्चा रंगली आहे. मात्र, या व्हायरल दाव्यामागील सत्य आता समोर आले आहे.
पंतप्रधान मोदी ओमानमधील मस्कत येथे भारतीय समुदायाला संबोधित करत असताना आणि तिथल्या नेत्यांशी संवाद साधतानाचा हा व्हिडिओ आहे. व्हिडिओच्या एका विशिष्ट अँगलमध्ये मोदींच्या कानाजवळ एक चमकणारी वस्तू दिसत आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' आणि इन्स्टाग्रामवर हा व्हिडिओ शेअर करत अनेक युजर्सनी पंतप्रधानांच्या या नवीन 'लूक'वर कमेंट्स करण्यास सुरुवात केली.
सखोल तपासणी आणि उच्च गुणवत्तेच्या फोटोंचे निरीक्षण केल्यानंतर हे स्पष्ट झाले आहे की, पंतप्रधान मोदींनी कोणतेही कानातले घातलेले नाहीत. व्हिडिओमध्ये दिसणारी ती चमक केवळ कॅमेऱ्याच्या फ्लॅशची किंवा तिथल्या प्रकाशझोताची एक सावली किंवा रिफ्लेक्शनची असू शकते. किंवा कानामागे लावलेला कापूस आदी देखील असू शकतो परंतू ती इअररिंग नाही हे स्पष्ट दिसत आहे.
किंवा काही तज्ज्ञांच्या मते, तो कदाचित कानामागे लावला जाणारा एक छोटा 'हियरिंग एड' किंवा इन-इअर कम्युनिकेशन डिव्हाइसचा भाग असू शकतो, जो अनेकदा मोठ्या सार्वजनिक सभांमध्ये आवाजाच्या सुस्पष्टतेसाठी वापरला जातो.
पंतप्रधानांचा ओमान दौरा
पंतप्रधान मोदी दोन दिवसांच्या ओमान दौऱ्यावर होते. दोन्ही देशांमधील धोरणात्मक संबंध अधिक दृढ करण्यावर त्यांनी भर दिला आहे. त्यांनी मस्कतमध्ये भारतीय समुदायाला संबोधित केले आणि ओमानच्या सुलतानसोबत द्विपक्षीय चर्चा केली. मात्र, या गंभीर मुद्द्यांपेक्षा सध्या सोशल मीडियावर त्यांच्या 'कानातील चमके'चीच जास्त चर्चा होत आहे.