Pradeep Purohit on PM Modi: छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज आणि औरंगजेबाच्या उदात्तीकरणावरुन महाराष्ट्रात सध्या वातावरण चांगलेच तापले आहे. औरंगजेबाची कबर हटवण्याच्या मागणीवरुन सोमवारी नागपुरात मोठा हिंसाचार झाला. त्यानतंर आता आणखी एक वाद उफाळून आला आहे. ओडिशातील बारगढ येथील भाजप खासदार प्रदीप पुरोहित यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात भाषण करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची छत्रपती शिवाजी महाराजांशी (Chhatrapati Shivaji Maharaj) तुलना केली आहे. भाजप खासदाराच्या या विधानामुळे विरोधकांसह शिवप्रेमींनी संताप व्यक्त केला आहे.
पंतप्रधान मोदी हे गेल्या जन्मात छत्रपती शिवाजी महाराज होते, असं विधान भाजप खासदार प्रदीप पुरोहित यांनी केलं. भाजप खासदाराने लोकसभेत बोलताना एका साधूला भेटल्याचे सांगितले. एका साधूने मला सांगितले की पंतप्रधान मोदी हे त्यांच्या मागील जन्मी छत्रपती शिवाजी महाराज होते. पंतप्रधान मोदी हे पूर्वजन्मी छत्रपती शिवाजी महाराज होते त्यामुळे ते संपूर्ण देशाला विकास आणि प्रगतीकडे नेण्यासाठी काम करत आहे.
भाजप खासदार पुरोहित यांच्या या विधानाला ठाकरे गटासह, काँग्रेस आणि विरोधी पक्षातील सदस्यांनी विरोध केला. त्यानंतर रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी या वक्तव्यामुळे कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर सभागृहाच्या कामकाजातून ते काढून टाकण्याचा विचार करावा, अशी विनंती केली. त्यानंतर सभापती दिलीप सैकिया यांनी प्रदीप पुरोहित यांच्या शब्दांची चौकशी करून त्यांना सभागृहाच्या कामकाजातून काढून टाकण्याची कार्यवाही करावी, असे निर्देश दिले.
विरोधकांकडून टीकास्त्र
"भाजप खासदार प्रदीप पुरोहित यांनी संसदेत छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला. प्रदीप पुरोहित म्हणतात- नरेंद्र मोदी हे त्यांच्या मागील जन्मी शिवाजी महाराज होते. या पापाबद्दल भाजप आणि नरेंद्र मोदींनी माफी मागितली पाहिजे. प्रदीप पुरोहित यांना निलंबित करण्यात यावे," अशी मागणी काँग्रेसने केली आहे. तर शिवरायांचा वारंवार अपमान करणार्या भाजपचा जाहीर निषेध, असं ठाकरे गटानं म्हटलं आहे.
"हे भाजपवाले खऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांना मानत नाहीत. त्यांचे शिवाजी फक्त मोदी आहेत. हे लोक कुठून येतात. छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केल्याबद्दल भाजपने माफी मागावी," असं खासदार संजय राऊत यांनी म्हटलं.