PM Modi Security Breach in Punjab: पंजाब दौऱ्यात पंतप्रधान मोदींच्या सुरक्षेत त्रुटी, केंद्रीय गृहमंत्राने घेतला मोठा निर्णय, चौकशीसाठी तीन सदस्यीय समिती स्थापन
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2022 23:05 IST2022-01-06T23:04:33+5:302022-01-06T23:05:28+5:30
PM Narendra Modi Security Breach in Punjab : पंजाबमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दौऱ्या दरम्यान, त्यांच्या ताफ्यामध्ये सुरक्षा व्यवस्थेत झालेल्या त्रुटी प्रकरणात केंद्रीय गृहमंत्र्यालयाने मोठा निर्णय घेतला आहे.

PM Modi Security Breach in Punjab: पंजाब दौऱ्यात पंतप्रधान मोदींच्या सुरक्षेत त्रुटी, केंद्रीय गृहमंत्राने घेतला मोठा निर्णय, चौकशीसाठी तीन सदस्यीय समिती स्थापन
नवी दिल्ली - पंजाबमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दौऱ्या दरम्यान, त्यांच्या ताफ्यामध्ये सुरक्षा व्यवस्थेत झालेल्या त्रुटी प्रकरणात केंद्रीय गृहमंत्र्यालयाने मोठा निर्णय घेतला आहे. या प्रकरणात केंद्रीय गृहमंत्रालयाने एका चौकशी समितीची स्थापना केली आहे. या समितीचे नेतृत्व सुधीरकुमार सक्सेना, सचिव (संरक्षण), कॅबिनेट सचिवालय हे करतील. त्यांच्यासोबत या समितीमध्ये बलबीर सिंह, संयुक्त संचालक आयबी आणि एस सुरेश (आयजी) एसपीजी हेही सहभागी असतील. तसेच समितीला लवकरात लवकर अहवाल सपूर्द करण्याची सूचना देण्यात आली आहे.
गृहमंत्रालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार पंजाबच्या फिरोजपूर दौऱ्यादरम्यान, ज्याप्रकारे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सुरक्षाव्यवस्थेत चूक झाली त्यामुळे केंद्रीय गृहमंत्रालयाकडून खूप गंभीरपणे पावले उचलली जात आहेत. या प्रकरणाचे गांभीर्य पाहून गृहमंत्रालयाने या पूर्ण घटनेच्या तपासासाठी एका समितीची स्थापना केली आहे.
बुधवारी सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भटिंडा येथे पोहोचले होते. तेथून ते हेलिकॉप्टरच्या हुसेनीवाला येथे राष्ट्रीय शहीद स्मारकामध्ये जाणार होते. मात्र पाऊस आणि खराब दृष्यमानतेमुळे पंतप्रधानांनी सुमारे २० मिनिटे हवामान स्वच्छ होण्याची वाट पाहिली. मात्र तरीही हवामान सुधारले नाही. त्यामुळे पंतप्रधानांनी रस्तेमार्गाने राष्ट्रीय शहीद स्मारकाचा दौरा करण्याचा निर्णय घेतला. त्यामध्ये दोन तास लागणार होते.
गृहमंत्रालय सांगितले की, डीजीपी पंजाब पोलिसांकडून अत्यावश्यक सुरक्षा व्यवस्थेचा दुजोरा देण्यात आला होता. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी रस्ते मार्गाने पुढे निघाले. मात्र मोदींचा ताफा एका फ्लायओव्हरवर आला असताना आंदोलकांनी रस्ता ब्लॉक केलेला होता. त्यामुळे मोदींचा ताफा फ्लायओव्हरवर १५-२० मिनिटे अडकून पडला होता. ही मोदींच्या सुरक्षेमधील मोठी चूक मानली जात आहे.
गृहमंत्रालयाने सांगितले की, पंतप्रधानांच्या कार्यक्रमाची आणि दौऱ्याची माहिती पंजाब सरकारला आधीच देण्यात आली होती. प्रक्रियेनुसार त्यांना सुरक्षेसोबत इतर व्यवस्था तयार ठेवण्यास सांगितले होते. त्यामध्ये सांगण्यात आले आहे की, आकस्मिक योजना तयार ठेवण्यासाठी पंजाब सरकारला रस्ते मार्गावरील कुठल्याही वाहतुकीला सुरक्षित ठेवण्यासाठी आणि बंद करण्यासाठी अतिरिक्त सुरक्षा व्यवस्था करण्यात येणे आवश्यक होते. मात्र असे झाले नाही. कारण कुठल्याही प्रकारच्या सुरक्षा व्यवस्थेची तैनाती करण्यात आली नव्हती.