नवी दिल्ली: "ज्यांनी एका गुजराती व्यक्तीचे आणि महात्मा गांधींचे आडनाव चोरले, ते आज मोदींची 'कब्र' खोदण्याची भाषा करत आहेत," अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यसभेत काँग्रेसच्या घराणेशाहीवर आणि राजकीय संस्कृतीवर घणाघाती टीका केली. 'मोहब्बत की दुकान' चालवण्याचा दावा करणाऱ्यांच्या मनात प्रत्यक्षात किती द्वेष भरला आहे, याचा पाढाच पंतप्रधानांनी यावेळी वाचला.
पंतप्रधान म्हणाले की, चोरी करणे हा काहींचा जुना धंदा आहे. "ज्यांनी महात्मा गांधींचे नाव आणि आडनाव स्वतःच्या फायद्यासाठी चोरले, त्यांना जनतेने ओळखले आहे. जनतेने त्यांना वेळोवेळी नाकारले आहे, तरीही त्यांचा अहंकार सातव्या आसमानवर आहे," असा टोला त्यांनी राहुल गांधींचे नाव न घेता लगावला.
काँग्रेसकडून दिल्या जाणाऱ्या 'मोदी तेरी कब्र खुदेगी' या घोषणांचा समाचार घेताना पंतप्रधान म्हणाले की, "देशातील कोट्यवधी माता-भगिनींचे आशीर्वाद आणि गरिबांची सेवा हेच माझे सुरक्षाकवच आहे. तुम्ही कितीही खड्डे खोदले, तरी हे आशीर्वाद मला शक्ती देत राहतील. तुमचा तिरस्कार माझ्या कामाच्या गतीला रोखू शकणार नाही."
आमचे लक्ष केवळ पुढील निवडणूक नसून २०४७ पर्यंत भारताला विकसित राष्ट्र बनवणे हे आहे. भविष्यातील पिढ्यांना समृद्ध देश देण्याचे आमचे स्वप्न आहे. २५ कोटी लोक गरिबीतून बाहेर आले आहेत. काँग्रेसने फक्त 'गरिबी हटाओ'च्या घोषणा दिल्या, पण आम्ही प्रत्यक्ष काम केले. ४ कोटी गरिबांना पक्की घरे, वीज, पाणी आणि शौचालय उपलब्ध करून देणे हे माझे सौभाग्य असल्याचे पंतप्रधान म्हणाले.
काँग्रेसच्या 'स्टार्टअप'वर टोलाकाँग्रेसवर घराणेशाहीचा आरोप करताना पंतप्रधान मोदींनी 'स्टार्टअप' या शब्दाचा वापर करून राहुल गांधींवर अप्रत्यक्ष निशाणा साधला. "देशात आज दोन लाखांहून अधिक स्टार्टअप्स आहेत, पण काँग्रेसला आपल्या स्वतःच्या 'घरचा स्टार्टअप' (राहुल गांधी) लिफ्ट करता येत नाहीये," असा टोला त्यांनी लगावला.