संस्कृती, पर्यटनाला जगात सर्वोच्च पातळीवर नेण्यासाठी पंतप्रधान उत्सुक: गजेंद्रसिंह शेखावत
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2025 10:25 IST2025-03-07T10:21:27+5:302025-03-07T10:25:18+5:30
लोकमत एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन व राज्यसभेचे माजी खासदार डॉ. विजय दर्डा व लोकमतचे व्यवस्थापकीय संचालक देवेंद्र दर्डा यांच्याशी झालेल्या बैठकीत त्यांनी हे वक्तव्य केले.

संस्कृती, पर्यटनाला जगात सर्वोच्च पातळीवर नेण्यासाठी पंतप्रधान उत्सुक: गजेंद्रसिंह शेखावत
लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी भारतीय संस्कृती आणि पर्यटनाला जगात सर्वोच्च पातळीवर नेण्यासाठी प्रयत्नशील आहेत. त्याच उद्दिष्टाची पूर्तता करण्यासाठी केंद्रीय सांस्कृतिक आणि पर्यटन मंत्रालयाने उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे नुकत्याच पार पडलेल्या महाकुंभ मेळ्यात भारतीय संस्कृती आणि परंपरेचे भव्य दर्शन संपूर्ण जगाला घडविले, असे केंद्रीय सांस्कृतिक आणि पर्यटन खात्याचे मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांनी सांगितले. लोकमत एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन व राज्यसभेचे माजी खासदार डॉ. विजय दर्डा व लोकमतचे व्यवस्थापकीय संचालक देवेंद्र दर्डा यांच्याशी झालेल्या बैठकीत त्यांनी हे वक्तव्य केले.
बुधवारी, ६ मार्च रोजी झालेल्या या बैठकीत भारतीय संस्कृती आणि पर्यटनाच्या विविध पैलूंवर सखोल चर्चा झाली. गजेंद्रसिंह शेखावत यांनी सांगितले की, केंद्रीय सांस्कृतिक आणि पर्यटन मंत्रालयाने महाकुंभ मेळ्यात 'कलाग्राम' नावाचे एक सांस्कृतिक गाव उभारले. महाकुंभाच्या समृद्ध वारशाचे दर्शन त्यात घडविण्यात आले. हा प्रयत्न पंतप्रधान मोदी यांच्या दृष्टिकोनाशी सुसंगत असा आहे. महाकुंभ मेळ्यात कोट्यवधी लोक आले. त्यांनी महाकुंभमधील स्टॉलना भेट दिली. भारताच्या गेल्या दोन हजार वर्षांपासूनच्या सांस्कृतिक वारशाचे दर्शन या कलाग्राममधून लोकांना झाले.
पर्यटन हा राज्यांच्या सूचीतील विषय आहे. मात्र, केंद्रीय पर्यटनमंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांच्या नेतृत्वाखाली पर्यटनवृद्धीसाठी उत्तम धोरणे राबवत आहे. शेखावत यांच्या नेतृत्वाखाली भारताचा पर्यटन क्षेत्राचा आणखी विकास होईल, असा विश्वास डॉ. विजय दर्डा यांनी व्यक्त केला.
दिल्लीमध्ये येत्या १२ एप्रिल रोजी लोकमत सूर ज्योत्स्ना राष्ट्रीय संगीत पुरस्कार समारंभ होणार आहे. केंद्रीय पर्यटनमंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांना त्या कार्यक्रमाचे निमंत्रण डॉ. विजय दर्डा यांनी दिले. सिंगापूरमध्ये नुकत्याच झालेल्या लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेंशनवरील कॉफी टेबल पुस्तक डॉ. विजय दर्डा यांनी केंद्रीय पर्यटनमंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांना भेट दिले.
‘सेवाग्रामला जागतिक ओळख मिळवून द्या’
महात्मा गांधी यांचा आश्रम असलेले सेवाग्राम हे ठिकाण अजूनही जगासमोर ऐतिहासिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या ठळकपणे समोर आलेले नाही. सेवाग्रामला जागतिक ओळख मिळवून द्यावी, अशी विनंती डॉ. विजय दर्डा यांनी शेखावत यांना केली.