Bihar Election : या वर्षाच्या अखेरीस बिहारमध्ये विधानसभा निवडणुका आहेत. या पार्श्वभूमीवर भाजप आणि काँग्रेसमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फेऱ्या सुरू झाल्या आहेत. दरम्यान, राहुल गांधी मतदार हक्क यात्रेनिमित्त बिहारचा दौरा करत आहेत. यादरम्यारम्यान, काँग्रेसच्या मंचावरुन युथ काँग्रेसच्या स्थानिक नेत्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आईवरुन शिवीगाळ केल्याची घटना घडली. यावरुन आता केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली आहे.
आसामची राजधानी गुवाहाटी येथे एका सभेला संबोधित करताना अमित शाह म्हणाले की, २७ देशांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित केले आहे. असा पंतप्रधान ज्यांचा संपूर्ण जग आदर करतो, परंतु काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भारतीय राजकारणात द्वेष आणि तिरस्काराचे नकारात्मक राजकारण सुरू केले आहे. सध्या बिहारमध्ये घुसखोर बचाओ यात्रा सुरू आहे. या यात्रेतून पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दिवंगत आईसाठी अपशब्द वापरण्यात आले. हे काँग्रेस नेत्यांनी केलेले सर्वात घृणास्पद कृत्य आहे.
शाह पुढे म्हणाले की, राहुल गांधींनी या मंचावरुन द्वेषाचे राजकारण सुरू केले आहे. पंतप्रधान मोदींच्या दिवंगत आईबद्दल वापरल्या जाणाऱ्या अपशब्दांचा मी मनापासून निषेध करतो आणि मी संपूर्ण देशातील जनतेला सांगू इच्छितो की, राहुल गांधी यांनी सुरू केलेल्या निरर्थक, नकारात्मक आणि द्वेषपूर्ण राजकारणामुळे आपले सार्वजनिक जीवन उंचावणार नाही तर ते खोलवर जाईल.
द्वेषाचे हे राजकारण आजचे नाही. मोदीजी सत्तेत आल्यापासून सोनिया गांधी, राहुल गांधी, दिग्विजय सिंह, मणिशंकर अय्यर, जयराम रमेश, रेणुका चौधरी, प्रत्येक काँग्रेस नेत्याने मोदीजींसाठी अपशब्द वापरले आहेत. काही त्यांना मृत्युचा व्यापारी म्हणतात, काही त्यांना विषारी साप म्हणतात, काही त्यांना नीच म्हणतात, काही त्यांना रावण म्हणतात, काही त्यांना भस्मासुर म्हणतात, काही त्यांना विषाणू म्हणतात. काँग्रेस नेत्यांना काय वाटते? अशा प्रकारची भाषा वापरून तुम्हाला जनादेश मिळेल? आज मी काँग्रेस नेत्यांना सांगू इच्छितो की, भाजपला जितक्या जास्त शिव्या द्याल, तितके मोठे कमळ फुलून आकाशात पोहोचेल, असेही शाहांनी यावेली म्हणाले.