महाराष्ट्रातील १४ हजारांवर तरुणांना पीएम इंटर्नशिप; मुंबई, पुण्यातील तरूण आघाडीवर
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2025 08:11 IST2025-07-09T08:11:12+5:302025-07-09T08:11:40+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील एक कोटी तरुणांना ५०० मोठ्या कॉर्पोरेट कंपन्यांमध्ये इंटर्नशिप देण्याची घोषणा केली होती.

महाराष्ट्रातील १४ हजारांवर तरुणांना पीएम इंटर्नशिप; मुंबई, पुण्यातील तरूण आघाडीवर
चंद्रशेखर बर्वे
नवी दिल्ली : पंतप्रधान इंटर्नशिप योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील १४,४८८ तरुणांना इंटर्नशिप प्रदान करण्यात आली आहे. ही इंटर्नशिप मिळविण्यात मुंबई आणि पुण्यातील तरुण आघाडीवर आहेत.
कॉर्पोरेट मंत्रालयातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पीएम इंटर्नशिप योजनेच्या पहिल्या टप्प्यात देशभरातील एक लाख २७ हजार ५०८ तरुणांना इंटर्नशिप प्रदान करण्यात आली आहे. यात तामिळनाडू देशात पहिल्या क्रमांकावर आहे. येथील १४,५८५ तरुणांनी इंटर्नशिप मिळविली आहे. महाराष्ट्र (१४,४८८) दुसऱ्या क्रमांकावर आहे. यानंतर गुजरात (११,६९०), कर्नाटक (१०,०२२) आणि उत्तरप्रदेशचा (९०२७) क्रमांक येतो.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील एक कोटी तरुणांना ५०० मोठ्या कॉर्पोरेट कंपन्यांमध्ये इंटर्नशिप देण्याची घोषणा केली होती. २०२४-२५ मध्ये एक लाख २५ हजार इंटर्नशिपचे टार्गेट निश्चित करण्यात आले होते. मात्र, पहिल्या टप्प्यातच १,२७,५०८ तरुणांना इंटर्नशिप प्रदान करण्यात आली. यासाठी देशभरातून सहा लाख २१ हजार अर्ज प्राप्त झाले होते. ३१ डिसेंबर २०२४ पर्यंत महाराष्ट्राच्या ३७ जिल्ह्यांतील १४,४८८ तरुणांना इंटर्नशिप देण्यात आली.