नियोजन आयोगात सुंदोपसुंदी
By Admin | Updated: August 4, 2014 02:35 IST2014-08-04T02:35:30+5:302014-08-04T02:35:30+5:30
केंद्रीय नियोजन राज्यमंत्री राव इंदरजित सिंग आणि स्वतंत्र मूल्यांकन कार्यालयाचे महासंचालक अजय छिब्बर यांच्यात चांगलीच जुंपली

नियोजन आयोगात सुंदोपसुंदी
हरीश गुप्ता, नवी दिल्ली
केंद्रीय नियोजन राज्यमंत्री राव इंदरजित सिंग आणि स्वतंत्र मूल्यांकन कार्यालयाचे महासंचालक अजय छिब्बर यांच्यात चांगलीच जुंपली असून राव यांनी स्वतंत्र मूल्यांकन कार्यालय बंद करून छिब्बर यांना या पदावरून हटविण्याची शिफारस थेट पंतप्रधान मोदी यांच्याकडे केली आहे. यावर नेपाळ दौऱ्यावरून परतल्यानंतरच मोदी निर्णय घेतील. तथापि, सूत्रांनुसार हे कार्यालय गुंडाळून छिब्बर यांना बाहेरचा रस्ता दाखविला जाणार असल्याचे कळते.
२०१० मध्ये स्थापन करण्यात आलेल्या स्वतंत्र मूल्यांकन कार्यालयाचे (आयईओ) महासंचालक अजय छिब्बर यांनाही राज्यमंत्र्यांचा दर्जा आहे. त्यांनीच नियोजन आयोग गुंडाळण्याची शिफारस केली होती, तेव्हापासून नियोजन आयोगावरून या दोघांत जुंपली आहे.
नियोजन आयोग गुंडाळण्याची शिफारस संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारच्या राजवटीतच करण्यात आली होती. असे असले तरी मॉन्टेकसिंंह अहलुवालिया आणि इतर सदस्यांनी २६ मे २०१४ रोजी राजीनामे दिल्यानंतरही मोदी यांनी नियोजन आयोगाची फेररचना केलेली नाही.
स्वतंत्र मूल्यांकन कार्यालय नियोजन आयोगाच्या अंतर्गत येते. नियोजन आयोगाच्या मंजुरीतहत सुरू करण्यात आलेल्या कार्यक्रमांची बारकाईने तपासणी करण्याचे काम स्हे कार्यालय करते.
राव यांचे असे म्हणणे आहे की, स्वतंत्र मूल्यांकन कार्यालय म्हणजे वायफळ खर्च होय. कारण नियोजन आयोगाकडे असाच एक विभाग असल्याने या कार्यालयाकडून याच कामाची नक्कल केली जाते. नियोजन आयोगाकडील मूल्यांकन विभागाने ४६ अहवाल सादर केलेले आहेत, तर दुसरीकडे स्वतंत्र मूल्यांकन कार्यालयाने आजवर फक्त तीनच अहवाल दिले आहेत; परंतु तेही काही उपयोगाचे नाहीत.
राव यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी उपरोक्त शिफारस केल्याच्या वृत्तास दुजोरा दिला. तथापि, अधिक तपशील देण्याचे टाळले. नियोजन आयोगाचे स्वरूप आणि कार्यपद्धती निव्वळ अडथळा असून त्यापासून भारताच्या विकासाला काडीचीही मदत होत नाही, असे स्पष्ट करीत छिब्बर यांनी नियोजन आयोगाऐवजी एक थिंक टँक स्थापन करण्याची शिफारस केली आहे.