Air India Plane Crash Investigation Report: १२ जून २०२५. दुपारी दीड वाजताच्या सुमारास एअर इंडिया कंपनीचे एआय१७१ हे ड्रीमलायनर विमान लंडनला निघाले. विमानाने सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उड्डाण केले आणि अवघ्या काही सेंकदात ते कोसळले. पहिल्यांदाच ड्रीमलायनर विमानाचा इतका भीषण अपघात झाल्याने अनेक प्रश्न उपस्थित झाले. आता या अपघाताची चौकशी करत असलेल्या भारतीय विमान अपघात चौकशी विभागाने प्राथमिक अहवाल दिला आहे. त्यातून खळबळजनक माहिती नोंदवण्यात आली आहे. उड्डाण केल्यानंतर विमानाचे दोन्ही इंजिन एकदाच बंद पडले होते. त्याचबरोबर वैमानिकांमधील शेवटचा संवादही समोर आला आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
भारतीय विमान अपघात तपास विभागाने (AAIB) त्यांच्या अहवालात विमान उड्डाण केल्यानंतर काही सेकंदातच कोसळले, असे म्हटले आहे. विमान कोसळण्यापूर्वी विमानाच्या कॉकपिटमध्ये वैमानिकांमध्ये जो संवाद झाला, तो ब्लॅकबॉक्समध्ये रेकॉर्ड झाला आहे.
मी फ्यूल बंद केले नाही; अपघातापूर्वी वैमानिकांमध्ये काय बोलणं झालं?
अहवालात म्हणण्यात आले आहे की, दोन्ही वैमानिकांमध्ये संभाषण झाले होते. एका वैमानिकाने दुसऱ्या वैमानिकाला विचारले की, तू फ्यूल (इंधन) बंद का केले आहे? त्यावर दुसरा वैमानिक म्हणतो की, मी फ्यूल बंद केले नाही.
दोघांमधील संभाषण संपत नाही, तोच विमानाची गती कमी व्हायला लागते. विमानाचे दोन्ही इंजिन बंद पडतात आणि एअर इंडियाचे एआय१७१ विमान अहमदाबादमधील बीजे मेडिकल कॉलेजच्या विद्यार्थी वसतिगृहावत जाऊन पडते.
एएआयबीने १५ पानांचा प्राथमिक चौकशी रिपोर्ट सादर केला आहे. या रिपोर्टमध्ये विमान अपघाताबद्दलच्या तांत्रिक कारणांचा खुलासा झाला आहे. पण, महत्त्वाची गोष्ट म्हणजे कॉकपिटमध्ये दोन वैमानिकांमध्ये झालेल्या शेवटच्या संभाषणाने अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत.
दोन्ही इंजिनचा इंधन पुरवठा एकदाच बंद पडला
विमान धावपट्टीवरून लंडनच्या दिशेने हवेत झेपावले. त्याचवेळी दोन्ही इंजिनचा इंधन पुरवठा रन ते कटऑफ स्वीच म्हणजे सुरू असताना अचानक बंद झाला. हे काही सेकंदात घडले. त्यामुळे विमानाच्या थ्रस्टची क्षमता कमी होईल गेली. थ्रस्ट म्हणजे विमानाने उड्डाण केल्यानंतर इंजिन त्याला पुढच्या दिशेने जाण्यासाठी लागणारी ताकद निर्माण करते, तीच बंद झाली. त्यानंतर हे विमान पडले.