'पीके'चे पोस्टर अश्लील नाही - न्यायालय
By Admin | Updated: August 13, 2014 11:02 IST2014-08-13T11:02:47+5:302014-08-13T11:02:47+5:30
आमिर खानच्या पीके चित्रपटाचे पोस्टर अश्लील नाही असा निर्वाळा देत दिल्लीतील न्यायालयाने आमिर खानविरोधात गुन्हा दाखल करण्यासंदर्भातील याचिका फेटाळून लावली आहे.

'पीके'चे पोस्टर अश्लील नाही - न्यायालय
>ऑनलाइन टीम
नवी दिल्ली,दि. १३ - बॉलिवूडचा मि. परफेक्शनिस्ट आमिर खानच्या पीके चित्रपटाचे पोस्टर अश्लील नाही असा निर्वाळा देत दिल्लीतील न्यायालयाने आमिर खानविरोधात गुन्हा दाखल करण्यासंदर्भातील याचिका फेटाळून लावली आहे.
काही दिवसांपूर्वी आमिर खानचे निर्वस्त्र छायाचित्र असलेले पीके चित्रपटाचे पोस्टर झळकले होते. या पोस्टरवर देशभरात गदारोळ निर्माण झाला होता. याप्रकरणी आमिर खान, पीके चित्रपटाचे दिग्दर्शक आणि निर्माते राज कुमार हिरानी, विधू विनोद चोप्रा, सिद्धार्थ रॉय कपूर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करावा अशी मागणी करणारी याचिका दिल्लीतील मेट्रोपोलिटन कोर्टात दाखल करण्यात आली होती. या अश्लील छायाचित्रामुळे समाजावर विपरीत परिणाम होईल व लैंगिक अत्याचारांच्या गुन्ह्यांमध्ये वाढ होईल असे याचिकाकर्ते वकिल रंजन खतूमारिया यांचे म्हणणे होते.
मंगळवारी न्या. पवनसिंह रजावत यांनी ही याचिका फेटाळून लावल्याचे एका हिंदी वृत्तपत्राने म्हटले आहे. पीकेच्या पोस्टरमुळे लैंगिक भावनांना उत्तेजन मिळत नसल्याचे स्पष्ट करत याचिकाकर्त्यांनी केवळ प्रसिद्धीसाठीच हा खटाटोप केल्याचे न्यायालयाने म्हटले आहे.
केवळ नग्नतेच्या आधारे कोणतेही छायाचित्र अश्लील ठरु शकत नाही. जसे पूर्ण कपडे घातलेल्या व्यक्तीचे छायाचित्रही अश्लील वाटू शकते. त्याचप्रमाणे निर्वस्त्र व्यक्तीचे छायाचित्रही अश्लील होऊ शकत नाही असे मतही कोर्टाने मांडले. त्यामुळे या पोस्टरविरोधात एफआयआर दाखल करण्यात कोणताही आधार नसल्याचे सांगत कोर्टाने याचिका फेटाळून लावली.