हैदराबादमधील मतदाराच्या आयडीवर 'सलमान'चा फोटो
By Admin | Updated: February 2, 2016 17:12 IST2016-02-02T17:12:15+5:302016-02-02T17:12:44+5:30
हैदराबादमधील एका मतदाराच्या ओळखपत्रावर चक्क बॉलिवूडचा दबंग स्टार सलमान खानचे नाव आणि फोटो आढळल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.

हैदराबादमधील मतदाराच्या आयडीवर 'सलमान'चा फोटो
>ऑनलाइन लोकमत
हैदराबाद, दि. २ - हैदराबादमधील एका मतदाराच्या ओळखपत्रावर चक्क बॉलिवूडचा दबंग स्टार सलमान खानचे नाव आणि फोटो आढळल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. सलमानचा फोटो पाहून मतदान केंद्रावरील अधिकारीही अवाक झाले. ग्रेटर हैदराबाद महापालिकेच्या निवडणुकांसाठी मंगळवारी मतदान होत असतानाच हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.
गोवालीपुरा येथे मतदानासाठी आलेल्या एका इसमाचे व्होटर आयडी सर्वांनांच धक्का बसला. त्याच्या व्होटर आयडीवर चक्क अभिनेता सलमान खानचे नाव व फोटो होता, तसेच त्याच्या वडिलांच्या नावासमोरही सलीम खान यांचे नाव होते. सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे या सलमान खानचे वय होते, ६४ वर्ष. या सर्व घटनेनंतर तेथील अधिका-यांनी त्या इसमास मतदान करू देण्यास नकार देत तेथून परत पाठवले. मात्र मुंबईतील सलमान खानचे हैदराबादमधील हे व्होटर आयडी दिवसभरात सर्व सोशल नेटवर्किंग साईट्सवर व्हायरल झाले.
या घटनेमुळे निवडणूक यंत्रणेचा गलथान कारभार पुन्हा समोर आला आहे.