पीएफ पेन्शन दसपट वाढणार?
By Admin | Updated: April 12, 2017 04:20 IST2017-04-12T04:20:44+5:302017-04-12T04:20:44+5:30
खाजगी कंपन्या, महामंडळे आणि सहकारी संस्था यांच्या कर्मचाऱ्यांना कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेमार्फत (ईपीएफओ) देण्यात येणाऱ्या निवृत्तिवेतनात

पीएफ पेन्शन दसपट वाढणार?
नवी दिल्ली : खाजगी कंपन्या, महामंडळे आणि सहकारी संस्था यांच्या कर्मचाऱ्यांना कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेमार्फत (ईपीएफओ) देण्यात येणाऱ्या निवृत्तिवेतनात ४ ते १0 पट वाढ होण्याची शक्यता आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर केंद्र सरकारने यासंबंधीचा आदेश जारी केला आहे. ही वाढ पूर्वलक्ष्यी प्रभावाने १ जानेवारी १९९५पासून लागू होणार असून, त्यामुळे सध्या निवृत्तिवेतन घेणाऱ्यांना मागील काळातील फरकाची रक्कम मिळणार आहे.
सरकारने २३ मार्च रोजीच ईपीएफओच्या संबंधित कार्यालयांना यासंबंधीचा आदेश जारी केला आहे. या आदेशानुसार मासिक निवृत्तिवेतनात ६,२00 ते २६,000 रुपयांपर्यंत वाढ होऊ शकते. वाढीव निवृत्तिवेतन अदा करण्यासाठी ईपीएफओच्या कार्यालयांना आपल्या सॉफ्टवेअरमध्ये आवश्यक ते बदल करण्यास सांगण्यात आले आहे. ही सर्व कार्यवाही आॅगस्ट २0१७पर्यंत पूर्ण करावयाची आहे.
मध्य प्रदेशातील खारगाव येथील सहकारी बँकेच्या कर्मचारी संघटनेने यासंबंधी एक याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती. सर्वोच्च न्यायालयाने गेल्या वर्षीच कर्मचाऱ्यांच्या बाजूने निकाल दिला होता. त्यानुसार आता सरकारने आदेश जारी केला आहे. त्याआधी मध्य प्रदेश उच्च न्यायालयाच्या इंदूर खंडपीठानेही कर्मचाऱ्यांच्या बाजूनेच निकाल दिला होता.
सध्याच्या व्यवस्थेत ईपीएफओमार्फत किमान १ हजार आणि कमाल २,५00 रुपयांचे निवृत्तिवेतन दिले जाते. सप्टेंबर २0१४पासून या रकमा अदा केल्या जात आहेत. १९९५पासून किमान ४४0 आणि कमाल १,७५0 रुपयांचे निवृत्तिवेतन दिले जात होते. नव्या आदेशानुसार २,५00 रुपयांचे पेन्शन मिळणाऱ्या चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यास ८,७00 रुपये पेन्शन मिळेल. प्रथम श्रेणी कर्मचाऱ्यास २८,५00 रुपयांचे पेन्शन मिळेल.
कर्मचाऱ्यांचे मूळ वेतन आणि महागाई भत्ता याच्या १२ टक्के रक्कम ईपीएफओच्या फंडात दरमहा जमा होते. कंपन्यांकडूनही तेवढीच ईपीएफओला मिळते. तथापि, कंपन्यांच्या योगदानापैकी ८.३३ टक्के रक्कम पेन्शन फंडात जमा केली जाते. त्यावर नंतर कर्मचाऱ्यांना पेन्शन दिली जाते.
ईपीएफ आॅनलाइन काढण्याची सोयही संघटनेने करून दिली आहे. यात ३ तासांत रक्कम बँक खात्यात जमा होऊ शकते.
अशी होईल निवृत्तिवेतनातील वाढ
श्रेणीसध्याचे पेन्शन नवे पेन्शन लाभ
चतुर्थ२,५00८,७00६,२00
तृतीय २,५00 २0,000१७,५00
द्वितीय २,५00 २२,000 १९,५00
प्रथम २,५00 २८,५00२६,000