हुश्श... पेट्रोल, डिझेल स्वस्त होण्याची आशा पक्की, कच्च्या तेलाची किंमत घटली!
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2018 17:15 IST2018-05-25T17:15:40+5:302018-05-25T17:15:40+5:30
तेलाच्या भडक्यानं होरपळलेल्या जनतेला दिलासा मिळणार

हुश्श... पेट्रोल, डिझेल स्वस्त होण्याची आशा पक्की, कच्च्या तेलाची किंमत घटली!
नवी दिल्ली: पेट्रोल, डिझेलचे दर गेल्या 12 दिवसांपासून सतत वाढत असल्यानं सामान्य जनता हैराण झालीय. दरवाढीमुळे त्रस्त झालेल्या जनतेला दिलासा देण्यात मोदी सरकार अपयशी ठरत असताना आता आंतरराष्ट्रीय बाजारातून एक चांगली बातमी आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरील घडामोडींमुळे पेट्रोल, डिझेलचे दर कमी होण्याची शक्यता आहे.
शुक्रवारी रशियानं खनिज तेल उत्पादनाबद्दलच्या भूमिकेत थोडी नरमाई आणली. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात खनिज तेलाचे दर थोडे कमी झाले. देशातील तेल कंपन्या आंतरराष्ट्रीय बाजारातील दरांनुसार पेट्रोल, डिझेलचे दर ठरवत असल्यानं याचा फायदा कोट्यवधी लोकांना होऊ शकतो. शुक्रवारी आंतरराष्ट्रीय बाजारात खनिज तेल 44 सेंट्सनं स्वस्त झालं. त्यामुळे प्रति बॅरलचा दर 78.35 डॉलरवर आला. रशियाचे उर्जा मंत्री अॅलेक्झांडर नोवाक यांनी त्यांचे सौदी अरेबियाचे समकक्ष खालिद अल-फलिह यांच्याशी संवाद साधल्यानंतर खनिज तेलाच्या किमतींमध्ये घट झाली. खनिज तेलाचा आंतरराष्ट्रीय बाजारातील पुरवठ्याच्या अटी थोड्या शिथिल करण्याबद्दल या दोन्ही मंत्र्यांमध्ये चर्चा झाली. याचा परिणाम लगेचच खनिज तेलाच्या किमतींवर पाहायला मिळाला.
गेल्या वर्षभरात खनिज तेलाचा पुरवठा कमी झाला आहे. खनिज तेल निर्यात करणाऱ्या देशांच्या (ओपेक) कठोर नियमांमुळे आंतरराष्ट्रीय बाजारातील पुरवठा कमी झाला होता. याशिवाय व्हेनेझुएलाही आर्थिक संकटात सापडल्यानं खनिज तेलाच्या किमतीनं विक्रमी उसळी घेतली. रशिया आणि सौदी अरेबियानं आंतरराष्ट्रीय तेल पुरवठ्याचे नियम शिथिल केल्यानं खनिज तेलाचे दर कमी होण्याची शक्यता आहे. यामुळे देशातील पेट्रोल, डिझेलचे दर कमी होऊन जनतेला मोठा दिलासा मिळू शकतो.