रायपूरच्या कैलाशपुरी भागातील रहिवासी वंदना ठक्कर यांनी १५ वर्षांपूर्वी त्यांच्या दोन्ही मुली राधा आणि भक्ती यांच्या नावावर फक्त २० रुपयांत राधाभक्ती गृह उद्योग सुरू केला. आज त्या ३० हून अधिक प्रकारचे घरगुती अन्नपदार्थ तयार करत आहेत. तसेच १० महिलांना रोजगार देखील देत आहे. त्यांनी बनवलेला चिवडा, लाडू आणि इतर उत्पादनं छत्तीसगडसह देशातील अनेक राज्यांमध्ये आणि अगदी परदेशातही आपली वेगळी ओळख निर्माण करत आहेत.
वंदना यांचा हा प्रवास सोपा नव्हता. पतीच्या निधनानंतर वंदना यांना अनेक आर्थिक अडचणींचा सामना करावा लागला, परंतु त्यांच्या कौशल्याने आणि दृढनिश्चयाने त्यांनी आयुष्यात आलेल्या प्रत्येक अडचणीवर मात केली. सासरच्या कुटुंबाकडून आणि माहेरच्या घरातून मिळालेल्या पाठिंब्यामुळे त्यांचा आत्मविश्वास आणखी वाढला.
रायपूर तसेच दुर्ग, भिलाई आणि इतर शहरांच्या बाजारपेठांमध्ये वंदना यांनी आपल्य़ा खाद्यपदार्थाने स्वतःचं एक विशेष स्थान निर्माण केलं आहे. वंदनाच्या उत्पादनांचं वैशिष्ट्य म्हणजे ते पूर्णपणे शुद्ध आणि घरी बनवलेले असतात. त्यांच्या खाद्यपदार्थांना केवळ दिल्ली, मुंबई आणि बंगळुरूसारख्या देशातील मोठ्या शहरांमध्येच मागणी नाही, तर परदेशातील लोकांनाही ते खूप आवडतात.
वंदना यांनी तयार केलेले अन्नपदार्थ २ महिने खराब होत नाहीत, ज्यामुळे त्यांच्या ग्राहकांचा विश्वास टिकून राहतो. कठोर परिश्रम आणि समर्पण प्रत्येक महिलेसाठी प्रेरणादायी आहे. परिस्थिती कितीही कठीण असली तरी दृढनिश्चय आणि आत्मविश्वासाने प्रत्येक अडचणीवर मात करता येतं हेच यातून सिद्ध होतं.