एका व्यक्तीचा सर्पदंशाने ३० वेळा मृत्यू; लाटले २३ कोटी, भाजपाशासित राज्यात घोटाळा उघडकीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2025 06:06 IST2025-05-25T06:06:05+5:302025-05-25T06:06:54+5:30

सर्व संबंधितांवर शिस्तभंग प्रक्रिया सुरू असून, दोषींवर कठोर कारवाई केली जाईल.  

person died 30 times due to snakebite and 23 crore scam exposed | एका व्यक्तीचा सर्पदंशाने ३० वेळा मृत्यू; लाटले २३ कोटी, भाजपाशासित राज्यात घोटाळा उघडकीस

एका व्यक्तीचा सर्पदंशाने ३० वेळा मृत्यू; लाटले २३ कोटी, भाजपाशासित राज्यात घोटाळा उघडकीस

भोपाळ : मध्य प्रदेशातील सिवनी जिल्ह्याच्या केवळारी तहसीलमध्ये, नैसर्गिक आपत्तीत मृत्यू झाल्याच्या बनावट घटनांच्या आधारे तब्बल ११.२६ कोटी रुपयांचा अपहार झाल्याचा मोठा घोटाळा उघडकीस आला आहे. ‘द जंगल बुक’मधील प्रसिद्ध साप ‘का’चा संदर्भ देत या भागाची ओळख दिली जाते आणि तिथेच साप चावल्याच्या ३० बनावट मृत्यू दाखवून पैसे वळवण्यात आले. अशाप्रकारे राज्यात २३ कोटी रुपयांचा अपहार करण्यात आला आहे. 

सिवनी जिल्ह्यातील केवलारी तहसीलच्या बिलांच्या छाननीतून हा घोटाळा उघडकीस आला. वित्त विभागाने याची सविस्तर चौकशी सुरू केली आहे. या घोटाळ्याचा मुख्य सूत्रधार सहायक ग्रेड-३ चा कर्मचारी सचिन दहायक हा असून त्याने ११.२६ कोटी रुपये ४७ लोकांच्या बँक खात्यात जमा केल्याचे तपासात उघडकीस आले. यात त्याच्या ४६ नातेवाईक, मित्रमंडळींचा आणि एका सरकारी कर्मचाऱ्याचा समावेश आहे.  

२०१८-१९ ते २०२१-२२ दरम्यान झालेल्या या घोटाळ्यात सरकारी नोंदींमध्ये सर्पदंश, बुडून आणि वीज पडून मृत्यू झालेले अनेक जण आढळले. विशेषतः सर्पदंशामुळे अनेक ‘मृत्यू’ झाले. 

प्रशासनाचे म्हणणे काय?

सिवनीच्या जिल्हाधिकारी संस्कृती जैन यांनी सांगितले की, सर्व संबंधितांवर शिस्तभंग प्रक्रिया सुरू असून, दोषींवर कठोर कारवाई केली जाईल.  

बनावट आदेशांद्वारे रक्कम दिली

केवलारी तहसीलच्या नोंदींमध्ये रमेश नावाच्या व्यक्तीचा ३० वेळा सर्पदंशाने ‘मृत्यू’, तर द्वारिकाबाई २९ वेळा ‘मृत्यू’ झाल्याचे दाखवण्यात आले होते. तर राम कुमार याचा २८ वेळा मृत्यू दाखवून, शासनाच्या नैसर्गिक आपत्ती साहाय्य योजनेअंतर्गत ४ लाखांची भरपाई घेतली गेली. संपूर्ण व्यवहारात कोणतीही मृत्यू प्रमाणपत्रे, पोस्टमॉर्टम अहवाल, पोलिस पडताळणी नव्हती. चौकशीत आणखी ४ तहसीलदार, एक एसडीएम आणि एक अतिरिक्त सहाय्यक कर्मचाऱ्याचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले आहे.

 

Web Title: person died 30 times due to snakebite and 23 crore scam exposed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.