उघड्यावर शौचास बसणार्या कुटुंबाला ठोठावला 75 हजारांचा दंड
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2017 17:42 IST2017-09-19T17:42:07+5:302017-09-19T17:42:31+5:30
आजही देशाच्या ग्रामीण भागातील निम्म्याहून अधिक लोक उघड्यावर शौचाला जातात आणि दुर्गंधी व रोगराई पसरवतात.

उघड्यावर शौचास बसणार्या कुटुंबाला ठोठावला 75 हजारांचा दंड
बेतूल, दि. 19 - आजही देशाच्या ग्रामीण भागातील निम्म्याहून अधिक लोक उघड्यावर शौचाला जातात आणि दुर्गंधी व रोगराई पसरवतात. मध्यप्रदेशमधील बेतूल जिल्ह्यातील एका गावातील पंचायतीनं उघड्यावर शौचास बसणार्या कुटुंबाला 75 हजारांचा दंड ठोठावला आहे. त्याचप्रमाणे उघड्यावर शौचाला बसणाऱ्या अन्य 43 कुटुंबाला नोटीस पाठवली आहे. बेतूल जिल्ह्यातील रामभखेडी गावात हा प्रकार घडला आहे.
रामभखेडी पंचायतीचे सहाय्यक रोजगार आधिकारी कुंवरलाल म्हणाले की, गेल्या महिन्यात त्या कुटुंबांला उघड्यावर शौचास बसू नका, अन्यथा दंड ठोठावला जाईल असा सल्ला दिला होता. त्यानंतरही त्यांनी त्याकडे लक्ष दिले नाही. काल त्यांच्यावर कारवाई करताना 75 हजारांचा दंड ठोठावला. त्या कुटुंबामध्ये 10 सदस्य असल्याचे कुंवरलाल यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले की, मध्य प्रदेश पंचायत नियम 1999 नुसार ही कारवाई केली. प्रत्येक दिवसी प्रतिव्यक्ती 250 रुपये याप्रमाणे त्यांना 75000 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. या कुटुंबाप्रमाणे रामभखेडीतील अन्य 43 कुटुंबाला उघड्यावर शौचास बसू नका अशी नोटीस पाठवण्यात आली आहे.
रामभखेडीच्या सरपंच रामरेती बाई म्हणाल्या की, अनेकवेळा सांगूनही या कुटुंबातील सदस्यांनी घरातील शौचालयाचा वापर केला नाही. त्यामुळे त्यांच्यावरील ही कारवाई योग्यच आहे.