Pegasus Modi Govt : "पेगासस प्रकरणीही राहुल गांधींचे शब्द तंतोतंत खरे, नैतिकतेच्या आधारे मोदी सरकारने राजीनामा द्यावा"
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2022 17:40 IST2022-01-29T17:40:05+5:302022-01-29T17:40:35+5:30
न्यूयॉर्क टाईम्सने मोदी सरकारच्या खोटेपणाचा बुरखा फाडला, पेगासस प्रकरणी नाना पटोलेंचा निशाणा

Pegasus Modi Govt : "पेगासस प्रकरणीही राहुल गांधींचे शब्द तंतोतंत खरे, नैतिकतेच्या आधारे मोदी सरकारने राजीनामा द्यावा"
"पेगासस प्रकरणी न्यूयॉर्क टाईम्सने नरेंद्र मोदी सरकारचा खोटेपणा उघड केला आहे. मोदी सरकारने संसद, सर्वोच्च न्यायालय व जनतेला पेगासस प्रकरणी वारंवार खोटी माहिती देऊन फसवणूक केली आहे. न्यूयॉर्क टाईम्समुळे सत्य उघड झाले असून मोदी सरकारला आता सत्तेवर राहण्याचा नैतिक अधिकार राहिला नाही," असं म्हणत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी जोरदार निशाणा साधला. तसंच नैतिकतेच्या आधारे त्यांनी तात्काळ राजीनामा दिला पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली.
"मोदी सरकारने २०१७ मध्ये इस्रायल दौऱ्यावेळी क्षेपणास्त्र प्रणालीबरोबरच पेगासस हे स्पायवेअरही खरेदी केले होते. हा करार २ अब्ज डॉलरचा होता. दोन्ही देशांची शस्त्रास्त्रे आणि इंटेलिजेंस गियर पॅकेज खरेदी करण्यावर सहमती झाली होती. यातच पेगासस आणि क्षेपणास्त्र प्रणालीचाही समावेश होता. पेगाससप्रकरणी राहुलजी गांधी यांनी मोदी सरकारवर गंभीर आरोप केले होते. संसदेत काँग्रेस व विरोधी पक्षांनीही या विषयावर सरकारला प्रश्न विचारले होते परंतु मोदी सरकारने याचा साफ इन्कार केला होता," असं पटोले म्हणाले.
पेगाससची खरेदी ही फक्त दोन देशातच केली जाते असे इस्त्राईलने स्पष्ट केले होते. त्यावरूनच हे हेरगिरी तंत्रज्ञान सरकारने किंवा सरकारच्यावतीने कोणी खरेदी केले का असा विरोधी पक्षांचा सरकारला थेट सवाल होता. परंतु मोदी सरकारने संसद, सुप्रीम कोर्ट व भारतीय जनतेला खोटी माहिती दिली, त्यांची दिशाभूल केली हे आता स्पष्ट झाल्याचे त्यांनी नमूद केले.
'खासगी आयुष्यात घुसखोरी'
पेगाससच्या माध्यमातून काँग्रेस नेते राहुल गांधी, त्यांच्या कार्यालयातील ५ सहकारी, विरोधी पक्षांचे नेते, माजी पंतप्रधान देवेगौडा, कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या, न्यायाधीश, पत्रकार, संरक्षण दलातील अधिकारी, सरकारविरोधी भूमिका घेणारे सामाजिक कार्यकर्ते यांच्याबरोबरच मोदी सरकारमधील काही मंत्री व त्यांच्या स्टाफची हेरगिरी करण्यात आली होती. संविधानाने दिलेले व्यक्तीस्वातंत्र्य अशा पद्धतीने हेरगिरी करत धोक्यात आणून त्यांच्या खाजगी आयुष्यात घुसखोरी केल्याचेही पटोले म्हणाले.
केंद्र सरकारने हेरगिरी केली नसल्याचे प्रतिज्ञापत्र न्यायालयात दिले होते. परंतु आता न्यूयॉर्क टाईम्सनेही मोदी सरकारचा खोटा बुरखा फाडला आहे, त्यांना सत्तेवर राहण्याचा कोणताच नैतिक अधिकार राहिलेला नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.