पीडीपी, काँग्रेसचा नॅशनल कॉन्फरन्सला पाठिंबा; राज्यसभेच्या ४ जागांसाठी नवे राजकीय समीकरण
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2025 06:30 IST2025-10-24T06:29:58+5:302025-10-24T06:30:43+5:30
जम्मू व काश्मीरच्या इतिहासात एकमेकांचे विरोधक असलेले हे पक्ष भाजपला शह देण्यासाठी एकत्र आले आहेत.

पीडीपी, काँग्रेसचा नॅशनल कॉन्फरन्सला पाठिंबा; राज्यसभेच्या ४ जागांसाठी नवे राजकीय समीकरण
श्रीनगर: जम्मू व काश्मीरच्या चार राज्यसभा जागांसाठी होणाऱ्या मतदानात पीडीपी व काँग्रेस नॅशनल कॉन्फरन्सला पाठिंबा देणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. जम्मू व काश्मीरच्या इतिहासात एकमेकांचे विरोधक असलेले हे पक्ष भाजपला शह देण्यासाठी एकत्र आले आहेत. पीडीपी नेत्या मेहबुबा मुफ्ती यांनी गुरुवारी नॅशनल कॉन्फरन्सला पाठिंबा देत असल्याची घोषणा केली.
काँग्रेसही सोबत
राज्यसभेच्या जागेवरून काँग्रेस व नॅशनल कॉन्फरन्समध्ये वाद होता. काँग्रेसने पाठिंबा देण्यास नकारही दिला होता. पण, ज्येष्ठ नेत्यांच्या गाठीभेटी व चर्चेनंतर काँग्रेस आमच्यासोबत आहे, त्यांचा आम्हाला पाठिंबा आहे, अशी माहिती फारुक अब्दुल्ला यांनी पत्रकारांना दिली.
या निवडणुकांत आपण नसू पण तरुण रक्ताला वाव दिला जाईल. काश्मीरला समृद्ध करायचे आहे तर नव्या तरुण खासदारांना संसदेत पाठवावे लागेल. ते राज्याच्या समस्या मांडतील. आमचे घर समृद्ध झाले तर देशही समृद्ध होईल. असे प्रतिपादन अब्दुल्ला यांनी केले.