पुतणीच्या स्वप्नात घरात शिवलिंग स्थापित केल्यास प्रगती होईल असं दिसल्यानंतर काकाने कुटुंबीयांसह ५०० किमी दूरवर असलेल्या द्वारकेतील मंदिरातून प्राचीन शिवलिंग चोरल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. गुजरातमधील द्वारका येथे महाशिवरात्रीच्या एक दिवस आधी प्राचीन मंदिरातील शिवलिंग चोरीस गेल्याने खळबळ उडाली होती. दरम्यान, हे शिवलिंग समुद्रात बुडवण्यात आल्याती शंका उपस्थित झाल्याने पोलिसांना स्कूबा डायविंग टीमच्या मदतीने या शिवलिंगाचा शोध घेतला. मात्र चोरीबाबत सत्य समोर आलं तेव्हा सर्वांनाच धक्का बसला.
याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार द्वारकेपासून ५०० किमी दूर असलेल्या सांबरकाठा येथील हिंमतनगरमध्ये राहणाऱ्या महेंद्र मकवाणा यांच्या पुतणीला एक स्वप्न पडलं होतं. या स्वप्नामध्ये तिला घरात शिवलिंग स्थापन केल्याने कुटुंबाची प्रगती होईल, असे संकेत मिळाले. त्यानंतर कुटुंबाने मंदिरातून शिवलिंग चोरण्याचा कट रचला.
तसेच शिवलिंग चोरण्यासाठी कुटुंबातील ७ ते ८ सदस्य काही दिवसांपूर्वी द्वारकेत पोहोचले. त्यांनी तिथे एका मंदिरात टेहेळणी केली. तसेच एकेदिवशी संधी साधून त्यांनी मंदिरातील शिवलिंगाची चोरी करून ते घरामध्ये आणून स्थापित केले. दरम्यान, पोलिसांनी शिताफीने तपास करून आरोपींचा शोध लावला आणि महेंद्र, वनराज, मनोज आणि जगत यांना अटक केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार चोरीमध्ये कुटुंबातील तीन महिलांचा समावेश आहे. तसेच इतर आरोपींना लवकरच अटक करण्यात येईल, असेही पोलिसांनी सांगितले.