Pashu Aadhar: माणसांचे झाले, आता म्हशींचेही आधार कार्ड बनणार; खुद्द मोदींनीच केली घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2022 16:19 IST2022-09-12T16:15:52+5:302022-09-12T16:19:42+5:30
Aadhaar card for Buffalo, Cow: मोदी यांनी आज आंतरराष्ट्रीय डेअरी संमेलनाचे उद्घाटन केले. यावेळी त्यांनी ही घोषणा केली.

Pashu Aadhar: माणसांचे झाले, आता म्हशींचेही आधार कार्ड बनणार; खुद्द मोदींनीच केली घोषणा
गेल्या काही वर्षांत आधार कार्डने करोडो भारतीयांच्या आयुष्यात एक वेगळी पहाट आणली आहे. किसान योजना असो की अन्य कोणतीही सरकारी मदत थेट शेतकरी, नागरिकाच्या खात्यात जाते. यामुळे भ्रष्टाचार तेवढ्यापुरता कमी झाला आहे, असे म्हणायला हरकत नाही. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तुम्हाला ऐकायला थोडी विचित्र वाटेल परंतू, म्हशीचेही आधार कार्ड काढण्याची घोषणा केली आहे. महत्वाचे म्हणजे याची तयारीही सुरु झाल्याचे ते म्हणाले.
मोदी यांनी आज आंतरराष्ट्रीय डेअरी संमेलनाचे उद्घाटन केले. यावेळी त्यांनी ही घोषणा केली. सर्व दुग्धजन्य प्राण्यांचे आधार कार्ड बनविले जाणार आहे, असे ते म्हणाले. भारतातील डेअरी क्षेत्राला विज्ञानाशी जोडून त्याचा विस्तार केला जात आहे. भारत दुग्धजन्य प्राण्यांचा सर्वात मोठा डाटाबेस तयार करत असल्याची माहिती त्यांनी दिली. डेअरी क्षेत्राशी निगडीत प्रत्येक जनावराला टॅग केले जात आहे, असे ते म्हणाले.
आधार कार्ड बनवण्यासाठी बायोमेट्रिक माहिती लागते. म्हणजे बोटांचे ठसे, डोळे आदी माहिती घेतली जाते. याप्रमाणे आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने प्राण्यांची बायोमेट्रिक माहिती घेतली जाणार आहे, असे मोदी म्हणाले. पशु आधार असे या मोहिमेचे नाव देण्यात आले आहे. जनावरांच्या आरोग्यावर लक्ष ठेवण्यासोबतच दुग्धजन्य पदार्थांशी संबंधित बाजारपेठ विस्तारण्यास मदत होईल, असे मोदींचे म्हणणे आहे.
बन्नी म्हैस...
गुजरातमधील कच्छमध्ये बन्नी म्हैशीची प्रजाती आहे. या म्हैशीचा मोदींनी एक किस्सा सांगितला आहे. दिवसा तिथे खूप उन असते. यामुळे ही म्हैस रात्रीच्यावेळी चरते. ती चाऱ्यासाठी गोठ्यापासून १५ ते १७ किमीचा प्रवास करते. परंतू दिवस उजाडू लागताच ती परत तिच्या गोठ्यात वाट न चुकता येते. बन्नी म्हैस गोठा किंवा रस्ता चुकल्याचे खूप कमी ऐकू येते. परदेशातून आलेल्या आमच्या मित्रांना हे ऐकून धक्का बसेल की ती जेव्हा चरायला जाते तेव्हा तिचा मालक किंवा गुराखी त्यांच्यासोबत नसतो. वाळवंटात पाणी कमी असते परंतू, त्या पाण्यातही तिचे भागते, असे मोदी म्हणाले.