चीनला उत्तर देण्यासाठी भारत यूएनच्या करारामध्ये सहभागी
By Admin | Updated: June 20, 2017 13:04 IST2017-06-20T13:04:01+5:302017-06-20T13:04:01+5:30
व्यापार विस्तार करण्यासाठी भारत संयुक्त राष्ट्राच्या टीआयआर कन्वेंशनमध्ये सहभागी झाला आहे. या कन्वेंशनमध्ये सहभागी होणारा भारत 71 वा देश आहे.

चीनला उत्तर देण्यासाठी भारत यूएनच्या करारामध्ये सहभागी
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 20 - व्यापार विस्तार करण्यासाठी भारत संयुक्त राष्ट्राच्या टीआयआर कन्वेंशनमध्ये सहभागी झाला आहे. या कन्वेंशनमध्ये सहभागी होणारा भारत 71 वा देश आहे. या करारामुळे भारताला व्यापारी विस्तार करण्याची संधी उपलब्ध होणार आहे. भारताला स्वत:ला व्यापाराचे केंद्र म्हणून विकसित करता येईल. भारताचे अनेक कनेक्टिविटी प्रकल्प विविध देशांच्या वाहतूक आणि कस्टम व्यवस्थेशी अनुरुप नसल्यामुळे अडचणींचा सामना करावा लागत होता.
पण टीआयआर लागू झाल्यानंतर भारताला या अडचणींचा सामना करावा लागणार नाही. मी टीआयआर कुटुंबात भारताचे स्वागत करतो. भारताचा सहभाग हा दक्षिण आशियातील परिवहन, व्यापार आणि विकासाच्या दिशेने हे एक महत्वपूर्ण पाऊल आहे असे आयआरयूचे सरचिटणीस उमबेर्टो डि प्रेटो यांनी सांगितले. टीआयआरमुळे भारताला म्यानमार, थायलंड, बांगलादेश, भूतान आणि नेपाळ बरोबर व्यापाराची जटिल प्रक्रिया अधिक सोपी होईल.
भारताला यामुळे यूरेशियापर्यंत व्यापार करता येईल. टीआयआरमध्ये भारताच्या सहभागी होण्याचे व्यापारावर दूरगामी परिणाम होतील. आतार्यंत विविध देशांमध्ये माल घेऊन जाताना भारताला व्यापारी प्रक्रियांचा सामना करावा लागत होता. पण या करारामुळे अशा अडचणींचा सामना करावा लागणार नाही. पैसा आणि वेळ दोन्ही वाचेल. टीआयआरमध्ये सहभागी झाल्याने भारताला विविध देशांच्या आंतरराष्ट्रीय सीमांवर कर न भरता व्यापारी मालाची ने-आण करता येईल.
चीनला उत्तर
चीनच्या महत्वकांक्षी "वन बेल्ट वन रोड" धोरणाला भारताचे हे एकप्रकारे उत्तर आहे. टीआयआर हे चीनच्या ओबीओआर धोरणाला पर्याय आहे. यामुळे भारताच्या उत्तर-दक्षिण ट्रान्सपोर्ट कॉरिडोर (आयएनएसटीसी) आणि इराणमधील चाबहार प्रकल्पाला नवीन आयुष्य मिळेल. भारत या प्रकल्पावर ब-याच काळापासून काम करत आहे.
काय आहे आयएनएसटीसी
आयएनएसटीसी 7200 किलोमीटरमध्ये पसरलेला जमीन आणि समुद्र मार्ग आहे. या योजनेव्दारे रशिया, इराण, मध्य आशिया, भारत आणि युरोपमध्ये व्यापाराला प्रोत्साहन देण्याचा उद्देश आहे. सध्याचा जो मार्ग आहे त्या तुलनेत आयएनएसटीसी 30 टक्के स्वस्त मार्ग आहे.