सरकारी कंपन्या धोक्यात, संसदेत सोनिया गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2019 16:37 IST2019-07-02T16:37:18+5:302019-07-02T16:37:31+5:30
लोकसभेत आज यूपीएच्या प्रमुख सोनिया गांधींनी मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

सरकारी कंपन्या धोक्यात, संसदेत सोनिया गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल
नवी दिल्लीः लोकसभेत आज यूपीएच्या प्रमुख सोनिया गांधींनी मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. रायबरेली या मतदारसंघासह रेल्वेच्या 6 युनिट्सच्या खासगीकरणाचा मुद्दा उपस्थित केला आहे. रायबरेलीतल्या कोच फॅक्ट्रीचं खासगीकरण केलं जातंय. ही देशाची अमूल्य संपत्ती कवडीमोल दरानं खासगी हातात सोपवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. अशानं हजारो लोक बेरोजगार होणार आहेत.
मोदींना उद्देशून त्या म्हणाल्या, देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू सार्वजनिक उद्योगांना देशाच्या विकासाची पूंजी समजत होते. मला सांगताना अतीव दुःख होत आहे की, मोदी सरकार मजूर आणि गरीब लोकांना विसरून फक्त काही उद्योगपतींना फायदा पोहोचवण्यासाठी काम करत आहे. मजुरांचं हक्क हिसकावून घेत कशा प्रकारे उद्योगपतींना लाभ पोहोचवला जात आहे हे सर्वश्रुत आहे. मेक इन इंडियाच्या कार्यक्रमावरूनही सोनियांनी लक्ष्य करत मोदींवर निशाणा साधला. सरकारनं रेल्वेचं वेगळं बजेट मांडण्याची परंपरा कशासाठी बंद केली ते मला माहीत नाही.
एचएएल, बीएसएनएल आणि एमटीएनएलबरोबर काय होतंय हे लपून राहिलेलं नाही. सरकारनं रायबरेलीतली मॉडर्न कोच फॅक्ट्री आणि सार्वजनिक संपत्तीचं संरक्षण केलं पाहिजे. मजूर आणि कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांप्रति आदर ठेवण्याचीही गरज आहे. सोनियांनी जेव्हा मोदींवर उद्योगपतींना फायदा पोहोचवण्याच आरोप केला, तेव्हा इतर काँग्रेस खासदारांनी बाकं वाजवून त्यांना अनुमोदन दिलं.