Parliament Monsoon Session: लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी संसदेपासून ते स्थानिक पातळीपर्यंत मोदी सरकारविरुद्ध मोर्चा उघडला आहे. मोदी सरकार आणि भाजपला कोंडीत पकडण्याची एकही ते संधी सोडत नाहीत. अशातच अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर २५ टक्के कर लादला आणि भारताची अर्थव्यवस्था 'मृत' असल्याची टीका केली. राहुल गांधींनी त्या टीकेचे समर्थन केले आणि सरकारविरोधात मोठा जनाधार निर्माण करण्याचा प्रयत्न करताहेत. मात्र, त्यांच्याच पक्षाचे काही नेते त्यांना घरचा आहेर देत आहेत.
ट्रम्प यांच्याच सुरात सुर मिशळत राहुल गांधी म्हणाले की, "हो, हे खरं आहे. भारताची अर्थव्यवस्था मृत आहे. पंतप्रधान आणि अर्थमंत्र्यांशिवाय सर्वांना हे माहित आहे. अदानींना मदत करण्यासाठी मोदी सरकारने देशाची अर्थव्यवस्था उद्ध्वस्त केली आहे." अशाप्रकारे राहुल गांधी मोदी सरकारविरुद्ध राजकीय अजेंडा तयार करण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, काँग्रेस खासदार मनीष तिवारी, शशी थरूर आणि राजीव शुक्ला यांच्या विधानांकडे पाहिले, तर ते राहुल गांधींच्या विधानाच्या पूर्णपणे विरुद्ध असल्याचे दिसते. राहुल गांधी ट्रम्प यांच्या दाव्याचे समर्थन करतात, तर थरूर, तिवारी आणि शुक्ला वेगळी भूमिका मांडत आहेत.
काय म्हणाले तिवारी, शुक्ला आणि थरूर ?
मोदी सरकारला कोंडीत पकडण्याची राहुल गांधींची रणनीती भाजपने नव्हे तर काँग्रेसनेच हाणून पाडली आहे. ज्या दिवशी राहुल गांधींनी मृत अर्थव्यवस्थेबद्दल ट्रम्प यांच्या विधानाचे समर्थन केले, त्या दिवशी काँग्रेस खासदार राजीव शुक्ला यांनी अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचे विचार खोडून काढले आणि ते चुकीचे असल्याचे सांगितले. ते म्हणाले की, भारतीय अर्थव्यवस्था मृत नाही. देशातील आर्थिक सुधारणा पीव्ही नरसिंह राव आणि मनमोहन सिंग यांच्या कार्यकाळात सुरू झाल्या. अटलबिहारी वाजपेयींनी त्या सुधारणा पुढे नेल्या आणि मनमोहन सिंग यांनी त्यांच्या दहा वर्षांच्या कार्यकाळात त्या मजबूत केल्या. सध्याच्या केंद्र सरकारनेही यावर काम केले आहे. आपली आर्थिक स्थिती अजिबात कमकुवत नाही.
काँग्रेस खासदार शशी थरूर म्हणाले की, भारताची अर्थव्यवस्था अजिबात मृत नाही. अमेरिका ही आपल्यासाठी खूप मोठी बाजारपेठ आहे. सध्या व्यापार चर्चा सुरू आहेत. कर कमी होण्याची शक्यता आहे. जर असे झाले नाही, तर आपल्या निर्यातीला निश्चितच फटका बसेल. काँग्रेस नेते आणि माजी केंद्रीय मंत्री मनीष तिवारी म्हणाले की, हे स्वावलंबी भारताची ताकद दर्शवते. सर्व भारताच्या धोरणात्मक स्वायत्ततेचा पुरावा आहे, जी नेहरूंच्या अलिप्ततेपासून सुरू झाली आणि आता पंतप्रधान मोदींच्या स्वावलंबी भारताच्या विचारसरणीचा भाग आहे.
राहुल गांधींचा डाव उधळला
राजीव शुक्ला, शशी थरूर आणि मनीष तिवारी यांचे हे विधान अशा वेळी आले आहे, जेव्हा काँग्रेस पक्ष आणि राहुल गांधी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ आणि मृत अर्थव्यवस्थेच्या मुद्द्यावर सरकारला घेरत आहेत. एकीकडे राहुल गांधी सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करत आहेत, तर दुसरीकडे शुक्ला, थरूर आणि तिवारी यांचे विधान देशाच्या आर्थिक परिस्थितीवरील राहुल गांधींच्या विधानांच्या पूर्ण विरुद्ध आहे.