Rahul Gandhi Parliament Monsoon Session 2025: संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू झाले आहे. ऑपरेशन सिंदूरवरून पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी संसदेत विरोधकांनी गोंधळ करण्यास सुरुवात केली. लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही सभागृहांमध्ये विरोधकांनी पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना पकडण्यात अद्याप का यश आलेले नाही, असा विचारणा केली. तसेच ऑपरेशन सिंदूरवर चर्चेची मागणी केली. ट्रम्प यांनी आपणच भारत-पाकिस्तान युद्ध थांबविल्याचा दावा केल्यावरूनही सभागृहात गोंधळ झाल्याचे पाहायला मिळाले. यातच संसदेत बोलू दिले जात नसल्याचा आरोप विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केला आहे.
पत्रकारांशी बोलताना राहुल गांधी म्हणाले की, सभागृहात संरक्षण मंत्र्यांना बोलू दिले जात आहे. त्यांच्या लोकांना बोलायला दिले जाते. परंतु, विरोधक काही बोलू इच्छित असतील, तर त्यांना परवानगी नाकारली जाते. मी विरोधी पक्षनेता आहे. माझा हक्क आहे. मला कधी बोलू दिले जात नाही. हा नवा दृष्टिकोन आहे. सरकारने परवानगी दिल्यास चर्चा केली जाईल. परंतु, मुद्दा असा आहे की, सरकारच्या बाजूने असलेल्या सदस्यांना बोलले दिले जात असेल, तर आम्हा विरोधकांनाही बोलण्याची संधी दिली गेली पाहिजे. आम्ही दोन शब्द बोलण्याची विनंती केली तरी विरोधकांना बोलू दिले जात नाही, असा आरोप राहुल गांधी यांनी केला. राहुल गांधी संसद परिसरात पत्रकारांशी बोलत होते.
ऑपरेशन सिंदूरबाबत सरकारने निवेदन करावे
काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी बंधू राहुल गांधी यांचे समर्थन केले आहे. विरोधकांना बोलण्याची संधी दिली पाहिजे. सरकारने ऑपरेशन सिंदूरचा मुद्दा टाळण्याऐवजी त्यावर निवेदन करायला हवे, चर्चा करायला हवी, असे प्रियंका गांधी यांनी म्हटले आहे. लोकसभेचे कामकाज सुरू होताच विरोधी बाकावरील सदस्यांनी गोंधळ करायला सुरुवात केली. या गोंधळामुळे लोकसभेचे कामकाज दुपारी २ वाजेपर्यंत स्थगित करण्यात आले होते. तर राज्यसभेतही काँग्रेस सदस्य मल्लिकार्जुन खरगे यांनी ऑपरेशन सिंदूरवरून सरकारवर टीका केली. याला भाजपा सदस्य जेपी नड्डा यांनी उत्तर दिले. विरोधकांच्या गोंधळामुळे राज्यसभेचे कामकाज सुरुवातीला १२ वाजेपर्यंत स्थगित करण्यात आले होते.
दरम्यान, ऑपरेशन सिंदूर दरम्यान जगाने भारतीय सैन्याची ताकद पाहिली. ऑपरेशन सिंदूर अंतर्गत २२ मिनिटांत दहशतवाद्यांच्या ठिकाणांना लक्ष्य करण्यात आले आणि ती ठिकाणे जमीनदोस्त करण्यात आली. मेड इन इंडिया लष्करी शक्तीच्या या नवीन स्वरूपाकडे जग खूप आकर्षित झाले आहे. जेव्हा मी जगातील लोकांना भेटतो तेव्हा भारताने बनवलेल्या मेड इन इंडिया शस्त्रांबद्दल जगाचे आकर्षण वाढत आहे, असेच दिसते, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेचे अधिवेशन सुरू होताना सांगितले.