नशिबाने साथ दिली तर कुणीही कधीही रंकाचा राव बनू शकतो, तर नशीब रुसलं तर रावाचा रंक होण्यासही वेळ लागत नाही. असाच अनुभव एका मजुराला आला आहे. मध्य प्रदेशसमधील पन्ना येथे एका मजुराला नशिबाने अशी साथ दिली की, तो काही तासांमध्येच लखपती बनला.
माधव असं या आदिवासी तरुणाचं नाव आहे. पन्ना येथील कृष्णा कल्याणपूर पट्टीमधील उथळ खाणीमध्ये मजुरी करणाऱ्या माधवने आपलं नशीब आजमावण्यासाठी खोदकामास सुरुवात केली होती. दरम्यान, आज खाणीमध्ये पहिल्यांदाच खोदकाम करत असताना मौल्यवान वस्तू सापडली. खोदकाम करत असताना माधवला ११ कॅरेट ९५ सेंटचा उज्ज्वल प्रकारातील हिरा सापडला. या हिऱ्याची किंमत सुमारे ४० लाख रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे.
माधवला सापडलेल्या हिऱ्याबाबत माहिती देताना पन्ना हिरा कार्यालयातील एक अधिकारी रवी पटेल यांनी सांगितले की, ‘’हा हिरा खूप स्वच्छ आणि मौल्यवान आहे. तसेच त्याची किंमत अंदाजे ४० लाख रुपये एवढी आहे’’. माधव याने नियमानुसार हा हिरा पन्ना येथील हिरा कार्यालयात जमा केला आहे. आता या हिऱ्याचा लवकरच लिलाव करण्यात येणार असून, लिलावामधून येणाऱ्या रकमेतील १२.५ टक्के रक्कम रॉयल्टी म्हणून कापून उर्वरित रक्कम ही माधव याला दिली जाणार आहे.
मध्य प्रदेशमधील बुंदेलखंड विभागातील पन्ना जिल्ह्यात सुमारे १२ लाख कॅरेट हिऱ्यांचा साठा असल्याचा अंदाज आहे. त्यामुळे येथे खाणकाम करून हिरे मिळवण्यासाठी अनेक जण येत असतात. मात्र फारच थोड्यांना नशिबाची साथ मिळते.