मंदिरात प्रवेश करणाऱ्या अल्पवयीन दलित मुलाला अमानुष मारहाण, व्हिडीओ व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2019 14:23 IST2019-06-05T14:23:25+5:302019-06-05T14:23:34+5:30
राज्यस्थानमधल्या पाली जिल्ह्यात पुरोगामी भारताला काळिमा फासणारी घटना घडली आहे.

मंदिरात प्रवेश करणाऱ्या अल्पवयीन दलित मुलाला अमानुष मारहाण, व्हिडीओ व्हायरल
पालीः राज्यस्थानमधल्या पाली जिल्ह्यात पुरोगामी भारताला काळिमा फासणारी घटना घडली आहे. दलित समाजातील एका अल्पवयीन मुलानं मंदिरात प्रवेश केल्यानं त्याला अमानुष मारहाण करण्यात आली आहे. या मारहाणीचा व्हिडीओसुद्धा व्हायरल झाला आहे. पाली जिल्ह्यातील जैतारणमधल्या रासठाणा भागातल्या धनेरिया गावात हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. अल्पवयीन दलित मुलानं मंदिरात प्रवेश केल्यानं संतप्त जमावानं त्याचे हात-पाय बांधून त्याला रस्त्याच्या मधोमध उभ करून काठीनं मारहाण केली आहे.
पीडित अल्पवयीन दलित मुलगा हात जोडून दयेची भीक मागत असूनही त्या जमावानं त्याला निर्दयीपणे मारहाण केली आहे. तो मुलगा हात जोडून सांगत होता की, पुन्हा कधीही मंदिरात जाणार नाही. तरीही जमावानं त्याला चोपलं आहे. कडाक्याच्या उन्हातही जमाव त्याला बेदम मारहाण करत होता. या घटनेचा एक व्हिडीओसुद्धा बनवण्यात आला असून, तो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 1 जून रोजी या घडलेल्या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी या घटनेचा तीव्र निषेध नोंदवला आहे.
व्हिडीओ व्हायरल होताच आरोपींमधल्या एकानं पीडित अल्पवयीन मुलाच्या विरोधात मुलीची छेडछाड केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. त्यानंतर पोलिसांनी त्या अल्पवयीन दलित मुलालाच कोठडीत पाठवलं. मंगळवारी 4 जून रोजी पीडित अल्पवयीन दलित मुलाच्या मामांनी आरोपींविरोधात गुन्हा नोंदवला. आरोपी हे वजनदार कुटुंबातील असल्यानं पोलीस त्यांच्यावर कारवाई करत नसल्याचा आरोप पीडित मुलाच्या मामानं केला आहे.