पाकचे दुष्ट हेतू त्याच्याच मंत्र्याकडून उघड - कॅप्टन अमरिंदरसिंग
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2019 23:46 IST2019-12-01T23:46:34+5:302019-12-01T23:46:59+5:30
राशीद यांनीच ते मान्य केल्यामुळे सिंग यांनी काळजी व्यक्त केली.

पाकचे दुष्ट हेतू त्याच्याच मंत्र्याकडून उघड - कॅप्टन अमरिंदरसिंग
चंदीगड : पाकिस्तानचे लष्करप्रमुख कमर जावेद बाजवा यांच्याच डोक्यातून करतारपूर मार्गिकेची (कॉरिडोर) योजना निघाली आहे, असे पाकिस्तानचे रेल्वेमंत्री शेख राशीद यांनी सांगितल्यामुळे पाकिस्तानचा त्यामागील दुष्ट हेतूच उघड झाला आहे, असे पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदरसिंग यांनी रविवारी म्हटले.
राशीद यांनीच ते मान्य केल्यामुळे सिंग यांनी काळजी व्यक्त केली. सिंग म्हणाले की, करतारपूर मार्गिकेमागील पाकिस्तानचे दुष्ट हेतू राशीद यांनी पूर्णपणे उघड केले आहेत. ही मार्गिका उभय देशांमध्ये शांततेचे नाते जोडणारी ठरेल, अशी आशा भारताला वाटत होती. बाजवा हे करतापूर मार्गिकेने भारताला अशी काही दुखापत करतील की, ती त्याला कायमस्वरूपी लक्षात राहील, या राशीद यांनी केलेल्या विधानाला कॅप्टन सिंग यांनी तीव्र आक्षेप घेतला आहे. सिंग यांनी राशीद यांचे हे विधान भारताची सुरक्षितता आणि एकात्मतेला उघडपणे दिलेली धमकी आहे, असे म्हटले. मार्गिका खुली करण्याची उदारता आम्ही दाखवली हा आमचा दुबळेपणा समजण्याची चूक पाकिस्तानने करू नये, असे सांगून सिंग म्हणाले की, भारताच्या सीमा आणि लोकांवर हल्ला करण्याचा प्रयत्न पाकिस्तानने केल्यास त्याला चोख प्रत्यिुत्तर मिळेल.