घुसखोरीच्या प्रयत्नात पाकिस्तानचे होतेय जबर नुकसान
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2017 14:34 IST2017-08-04T14:26:13+5:302017-08-04T14:34:03+5:30
जम्मू-काश्मीरमध्ये पाकिस्तानकडून सातत्याने घुसखोरीचे प्रयत्न सुरु आहेत. पण यामध्ये मोठया प्रमाणावर त्यांचे दहशतवादी मारले जात आहेत.

घुसखोरीच्या प्रयत्नात पाकिस्तानचे होतेय जबर नुकसान
नवी दिल्ली, दि. 4 -जम्मू-काश्मीरमध्ये पाकिस्तानकडून सातत्याने घुसखोरीचे प्रयत्न सुरु आहेत. पण यामध्ये मोठया प्रमाणावर त्यांचे दहशतवादी मारले जात आहेत अशी माहिती संरक्षण मंत्री अरुण जेटली यांनी शुक्रवारी लोकसभेत दिली. पाकिस्तानला लागून असणआ-या सीमेवर भारतीय लष्कराने पूर्णपणे वर्चस्व प्रस्थापित केले असून, घुसखोरी रोखण्यासाठी सर्व आवश्यक पावले उचलली आहेत असे अरुण जेटली यांनी सांगितले.
पाकिस्तानकडून घुसखोरीचे प्रयत्न वाढले आहेत असे त्यांनी प्रश्नोत्तराच्या तासाला बोलताना सांगितले. सर्तक असलेल्या सुरक्षापथकांनी घुसखोरीचे अनेक प्रयत्न उधळून लावले असून, दहशतवाद्यांना कंठस्नान घातले आहे असे जेटली म्हणाले. नियंत्रण रेषेवर यावर्षात पाकिस्तानने आतापर्यंत 285 वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले आहे. 2016 च्या तुलनेत हा आकडा जास्त आहे. त्यावर्षी पाकिस्तानने वर्षभरात 228 वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले होते.
आंतरराष्ट्रीय सीमेवर पाकिस्तानकडून 221 वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन झाले. इथे सीमा सुरक्षा दल आणि लष्कर तैनात असते. लष्कराने नियंत्रण रेषा आणि आंतरराष्ट्रीय सीमेवर AIOS म्हणजे घुसखोरी रोखणारी सिस्टिम तयार केली आहे असे जेटलींनी आणखी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले. घुसखोरी करणा-या दहशतवाद्यांना हुडकून काढण्यासाठी रडार, सेन्सर्स आणि थर्मल इमेजर्सच्या मदतीने टेहळणी सुरु असते अशी माहिती त्यांनी दिली.
अनंतनागमध्ये हिजबुल मुजाहिद्दीनच्या दहशतवाद्याचा एन्काऊंटर
जम्मू काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत एक दहशतवाद्याला कंठस्नान घातले. ठार करण्यात आलेला दहशतवादी हिजबुल मुजाहिद्दीन संघटनेचा असल्याचे बोलले जात आहे. स्थानिक पोलिसांनीदेखील या वृत्ताला दुजोरा दिला आहे. एका पोलीस अधिका-याने दिलेल्या माहितीनुसार, जिल्ह्यातील बिजबेहरा परिसरात दहशतवादी शिरल्याची माहिती सुरक्षा दलाला मिळाली. यानंतर त्यांनी परिसराला घेराव घातला व शोधमोहीम सुरू केली. मात्र, रात्री अंधाराचा फायदा घेत दहशतवाद्यांनी गोळीबार केला आणि तेथून पसार होण्यात त्यांना यश आले.