India on Pakistan-Afghanistan Conflicts:भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने गुरुवारी पाकिस्तान आणि अफगाणिस्तानदरम्यान सुरू असलेल्या संघर्षावर अधिकृत प्रतिक्रिया दिली आहे. मंत्रालयाने स्पष्ट केले की भारत या परिस्थितीवर नजीकून लक्ष ठेवून आहे.
पाकिस्तानच्या आरोपांवर भारताची कठोर प्रतिक्रिया
गेल्या एका आठवड्यात अफगाणिस्तान आणि पाकिस्तानच्या सीमारेषेवर दोन वेळा चकमक झाली. पाकिस्तानने अफगाणिस्तानवर दहशतवाद्यांना आश्रय देण्याचा आरोप केला आणि या संघर्षासाठी अप्रत्यक्षपणे भारतावरही जबाबदारी ढकलण्याचा प्रयत्न केला आहे.
परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जायसवाल यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, 'पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यातील तणावाबाबत तीन गोष्टी स्पष्ट आहेत. पहिली- पाकिस्तान दहशतवादी संघटनांना आश्रय देतो आणि त्यांच्या कारवायांना पाठिंबा देतो. दुसरी- स्वतःच्या देशांतर्गत अपयशांसाठी शेजाऱ्यांना दोष देणे ही पाकिस्तानची जुनी सवय आहे. तिसरी- पाकिस्तान या कारणाने नाराज आहे की, अफगाणिस्तान स्वतःच्या भूभागावर सार्वभौमत्वाचा वापर करीत आहे.'
जायसवाल यांनी पुढे स्पष्ट केले की, 'भारत, अफगाणिस्तानच्या सार्वभौमत्व, प्रादेशिक अखंडता आणि स्वातंत्र्याचा पूर्णपणे आदर करतो आणि त्यासाठी कटिबद्ध आहे.' तसेच, येत्या काही दिवसांत अफगाणिस्ताना भारतीय दूतावास पुन्हा सुरू करणार असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.
ब्रिटनच्या निर्बंधांवर भारताची भूमिका
परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जायसवाल यांनी ब्रिटनने लादलेल्या नव्या निर्बंधांवर प्रतिक्रिया देताना सांगितले की, 'आम्ही ब्रिटनने जाहीर केलेल्या नव्या निर्बंधांची नोंद घेतली आहे, पण भारत कोणत्याही एकतर्फी निर्बंधांचा पाठपुरावा करत नाही. ऊर्जा सुरक्षेची तरतूद ही भारत सरकारची सर्वोच्च जबाबदारी आहे, कारण ती नागरिकांच्या मूलभूत गरजांशी संबंधित आहे. त्यामुळे ऊर्जा व्यापाराच्या बाबतीत कोणतेही दुहेरी निकष असू नयेत."
ट्रम्प यांच्या दाव्याचे खंडन
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताच्या रशियन तेल खरेदीवर भाष्य केले होते. ट्रम्प यांनी दावा केला की, त्यांची पीएम मोदींवर फोनवर चर्चा झाली आणि मोदींनी रशियन तेल खरेदी थांबवण्याचे आश्वासन दिले. यावर जायसवाल म्हणाले, 'पंतप्रधान मोदी आणि राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्यात काल कोणतीही दूरध्वनीवर चर्चा झाल्याची मला माहिती नाही.'