नवी दिल्ली : पठाणकोट हवाईदल तळावरील दहशतवादी हल्ल्याला पाकिस्तानाचा अप्रत्यक्ष पाठिंबा होता, असे संकेत संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांनी मंगळवारी दिले. हा हल्ला सरकारबाहेरील लोकांनी केला असला तरी सरकारच्या पाठिंब्याशिवाय ते हे कृत्य करू शकत नाहीत,असे संरक्षण मंत्र्यांनी सांगितले.पर्रीकर यांनी राज्यसभेत प्रश्नोत्तराच्या तासात एका उपप्रश्नाला उत्तर देताना सांगितले की, राष्ट्रीय तपास संस्थेची (एनआयए) चौकशी पूर्ण झाल्यावर वस्तुस्थिती समोर येईलच. पठाणकोटमधील हल्ला दहशतवादी होता की लष्कराच्या मदतीने हा कट रचण्यात आला, असा सवाल करण्यात आला होता. दुसरीकडे लोकसभेत याच प्रकरणी विचारण्यात आलेल्या एका प्रश्नाच्या उत्तरात पठाणकोटमधील हवाई दलाच्या तळावर हल्ला करणारे दहशतवादी पाकिस्तानातील जैश-ए-मोहम्मदशी संबंधित होते आणि या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या मौलाना मसूद अजहर व त्याच्या सहकाऱ्यांनीच या हल्ल्याचा कट रचला होता. याचे ठोस पुरावे राष्ट्रीय तपास संस्थेच्या (एनआयए) चौकशीत मिळाले आहेत,अशी माहिती गृहराज्यमंत्री किरण रिजिजू यांनी दिली. (लोकमत न्यूज नेटवर्क)
‘त्या’ हल्ल्याला पाकचा अप्रत्यक्ष पाठिंबा-पर्रीकर
By admin | Updated: March 2, 2016 02:35 IST