Indigo flight pakistan News: दिल्लीवरून श्रीनगरसाठी इंडिगोचेविमान हवेत झेपावले. श्रीनगरकडे जात असताना विमानाला खराब हवामानाचा फटका बसला. विमान गारपिटीच्या तडाख्यात सापडले. दृश्यमानता कमी झाल्याने वैमानिकांसमोरही मोठा पेच होता. त्यावेळी वैमानिकांनी तात्पुरता मार्ग बदलण्याचा विचार केला. त्यासाठी पाकिस्तानी हवाई हद्दीत जावं लागणार होतं. पण, २२७ प्रवाशांचे जीव संकटात असतानाही पाकिस्तानने त्याची नीच वृत्ती दाखवून दिली. त्यामुळे वैमानिकांना खराब हवामान असताना त्याच मार्गाने पुढे जावं लागलं.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
इंडिगोचे विमान 6E 2142 बुधवारी (२१ मे) श्रीनगरकडे जात असताना गारपीट आणि वादळाच्या तडाख्यात सापडले. त्यामुळे जोरात हादरे जाणवू लागल्याने विमानातील प्रवाशी घाबरून गेले होते. वादळाच्या तडाख्यातून बचावासाठी वैमानिकाने लाहौरच्या हवाई नियंत्रण कक्षाला संपर्क केला. वादळातून वाचण्यासाठी थोड्या वेळासाठी पाकिस्तानी हवाई हद्दीत प्रवेश करून देण्याची परवानगी मागितली, पण लाहौरच्या नियंत्रण कक्षाने ती अमान्य केली.
गारपीट आणि वादळाच्या तडाख्यात सापडलेल्या या विमानात २२७ प्रवासी होते. यात तृणमूल काँग्रेसचे ५ खासदारही होते. विमान वादळाच्या तडाख्यात सापडलेले असताना वैमानिकांनी प्रसंगावधान दाखवत सुखरूपपणे श्रीनगरपर्यंत नेले आणि विमानतळावर व्यवस्थित उतवले होते. यात विमानाच्या समोरील भागाचा मात्र मोठं नुकसान झालं.
या घटनेनंतर एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने चौकशी सुरू केली आहे. डीजीसीएच्या अधिकाऱ्याने सांगितले की, इंडिगोच्या विमानाला गारपीट आणि वादळाच्या तडाख्यातून जावे लागले. त्यामुळे वैमानिकांनी इमर्जन्सी स्थिती असल्याचे जाहीर केले होते. पण, वैमानिकांनी सुरक्षितपणे विमान उतरवले. या संपूर्ण घटनेची चौकशी सुरू करण्यात आली आहे.