पाकचे वर्तन ‘जैसे थे’
By Admin | Updated: January 18, 2015 01:58 IST2015-01-18T01:58:13+5:302015-01-18T01:58:13+5:30
अनेक वेळा चोख प्रत्युत्तर देण्यात येत असतानाही पाकिस्तानच्या वागणुकीत काही बदल झाल्याचे दिसत नाही, अशा शब्दात केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंग यांनी शनिवारी पाकवर हल्ला चढविला.

पाकचे वर्तन ‘जैसे थे’
नवी दिल्ली : अनेक वेळा चोख प्रत्युत्तर देण्यात येत असतानाही पाकिस्तानच्या वागणुकीत काही बदल झाल्याचे दिसत नाही, अशा शब्दात केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंग यांनी शनिवारी पाकवर हल्ला चढविला. सीमेपलीकडून दहशतवादी भारतावर हल्ले करण्याच्या तयारीत असल्याचे वृत्त गुप्तचर संस्थांनी दिले असतानाच गृहमंत्र्यांनी पाकवर टीका केली आहे, हे विशेष.
अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांच्या भारत दौऱ्याच्या काळात जम्मू-काश्मिरात व्यापक हल्ले घडवून आणण्याची दहशतवाद्यांची योजना असल्याचा इशारा गुप्तचर संस्थांनी दिलेला आहे. त्याबाबत विचारले असता राजनाथसिंग म्हणाले, अशाप्रकारचे कोणतेही हल्ले परतवून लावण्यात येतील. ओबामा २५ जानेवारीला तीन दिवसांच्या भारत दौऱ्यावर येणार आहेत. ते प्रमुख अतिथी म्हणून प्रजासत्ताक दिन परेडला उपस्थित राहतील. २०० दहशतवादी नियंत्रणरेषेपलीकडे पीर पंजालच्या टेकड्यांमधून ३६ ठिकाणांहून भारतात घुसखोरी करण्याच्या प्रयत्नात आहेत व या दहशतवाद्यांना पाकिस्तान मदत करीत आहे, असे १६ व्या कोअरचे जनरल आॅफिसर कमांडिंग जनरल के. एच. सिंग यांनी म्हटले आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)