पाकिस्तानी पत्नीने भारतीय उच्च न्यायलायचे दरवाजे ठोठावले! नेमका वाद काय? का पोहोचली कोर्टात?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2025 09:26 IST2025-12-10T09:20:13+5:302025-12-10T09:26:32+5:30
पाकिस्तानच्या कराची शहरात राहणाऱ्या निकिता नावाच्या महिलेने आपल्या भारतीय वंशाच्या पतीविरोधात उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

AI Generated Image
भारत आणि पाकिस्तानमधील एक वैवाहिक वाद आता थेट मध्य प्रदेशउच्च न्यायालयाच्या दारापर्यंत पोहोचला आहे. पाकिस्तानच्या कराची शहरात राहणाऱ्या निकिता नावाच्या महिलेने आपल्या भारतीय वंशाच्या पतीविरोधात उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. निकिताने तिचा पती विक्रम नागदेव याच्यावर लग्नाच्या नावाखाली फसवणूक केल्याचा आणि भारतात बेकायदेशीरपणे राहत असताना दुसरे लग्न करण्याची तयारी केल्याचा गंभीर आरोप केला आहे. हे प्रकरण इतकं संवेदनशील झालं आहे की, आता केंद्र सरकारनेही यात लक्ष घातलं असून विक्रमच्या सर्व कागदपत्रांची कसून चौकशी सुरू केली आहे.
कराचीत विवाह आणि फसवणुकीचा दावा
निकिताच्या म्हणण्यानुसार, २६ जानेवारी २०२० रोजी कराचीमध्ये तिचा विवाह विक्रम नागदेवसोबत झाला होता. लग्नाच्या वेळी विक्रम दीर्घकाळ मुक्कामी व्हिसा घेऊन पाकिस्तानमध्ये राहत होता. लग्नानंतर काही महिने दोघे सोबत राहिले आणि विक्रम तिला भारतात इंदूर येथेही घेऊन आला. मात्र, थोड्याच दिवसांत विक्रमचे वर्तन बदलले आणि त्याने बळजबरीने निकिताला पुन्हा पाकिस्तानला पाठवून दिले, असा तिचा आरोप आहे. निकिताच्या म्हणण्यानुसार, एकदा तिची पाठ फिरताच विक्रमने तिच्याशी संपर्क तोडला आणि तो पूर्णपणे दूर राहू लागला.
दुसरी बायको करण्याची तयारी..
सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, निकितासोबत घटस्फोट झाला नसताना आणि कायदेशीररित्या त्यांचे लग्न अस्तित्वात असतानाही विक्रमने दिल्लीतील एका तरुणीसोबत साखरपुडा केला आहे. निकिताने इंदूर हायकोर्टात दाखल केलेल्या याचिकेत म्हटले आहे की, तिची आणि विक्रमची कायदेशीररित्या फारकत झालेली नाही. असे असतानाही विक्रमने दुसरे लग्न करण्याचा बेत आखला आहे. हे सरळसरळ फसवणूक, छळ आणि गुन्हेगारी वृत्तीचे प्रकरण आहे. निकिताला बाजूला करून भारतात दुसरे लग्न करण्यासाठी ही संपूर्ण खेळी रचली गेली, असा तिचा दावा आहे. तिने आपला विवाह प्रमाणपत्र कोर्टासमोर सादर केले आहे, जे पाकिस्तानी सरकारने जारी केले आहे आणि यात दोघांनाही पाकिस्तानी नागरिक म्हणून नोंदवले आहे.
केवळ कौटुंबिक वाद नाही, गृह मंत्रालयाची एन्ट्री!
या प्रकरणाचे गंभीर स्वरूप लक्षात घेऊन केंद्रीय गृह मंत्रालयानेही याची दखल घेतली आहे. मंत्रालयातील एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, विक्रम नागदेवच्या सर्व कागदपत्रांची आणि त्याच्या भारतातील हालचालींची कसून चौकशी केली जात आहे. विक्रमने भारतात कोणत्या परिस्थितीत आणि कोणत्या नावांनी मालमत्ता खरेदी केली? त्याच्या भारतीय ओळखपत्रांची आणि सरकारी कागदपत्रांची सत्यता काय आहे? सिंधी पंचायतीने विक्रमने बनावट कागदपत्रे तयार केल्याबद्दल केलेल्या तक्रारीही तपासल्या जात आहेत.
या सर्व प्रकारामुळे हे प्रकरण केवळ पती-पत्नीमधील वादापुरते मर्यादित न राहता, आता त्याचे कायदेशीर आणि राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित पैलूही तपासले जात आहेत. विक्रमने भारत आणि पाकिस्तान या दोन्ही ठिकाणी आपल्या ओळखपत्रांचा कसा वापर केला, याचीही चौकशी सुरू आहे.
निकिताची मागणी काय?
निकिताने हायकोर्टाकडे अशी मागणी केली आहे की, विक्रमला त्वरित पाकिस्तानला परत पाठवण्याचे निर्देश द्यावेत. जेणेकरून तो भारतात आणखी कोणाची फसवणूक करू शकणार नाही आणि विवाह कायद्यांचे उल्लंघन थांबेल. सध्या उच्च न्यायालय या संपूर्ण प्रकरणाचे परीक्षण करत आहे, तर केंद्र आणि राज्य पातळीवरील यंत्रणा विक्रम नागदेवच्या सर्व नोंदी आणि कागदपत्रे तपासण्यात गुंतल्या आहेत.