पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने 'ऑपरेशन सिंदूर' करून पाकिस्तानात आश्रय घेणाऱ्या जवळपास १०० दहशतवाद्यांना कंठस्नान घातले. मात्र, आता असे काही व्हिडीओ आणि फोटो समोर येत आहेत, ज्यामध्ये पाकिस्तानचे काही लष्करी अधिकारी दहशतवाद्यांच्या अंत्ययात्रेत सहभागी झाल्याचे दिसले आहेत. भारतीय सैन्याने रविवारी एक यादी जाहीर केली, ज्यात पाकिस्तानच्या त्या अधिकाऱ्यांची नावे आहेत, जे पंजाब प्रांतात पार पडलेल्या दहशतवाद्यांच्या अंत्ययात्रेत अश्रू गाळताना दिसले.
या यादीत लाहोर कॉप्स कमांडर लेफ्टनंट जनरल फय्याज हुसेन शाह, लाहोर ११व्या इन्फंट्री बटालियनचे मेजर जनरल राव इम्रान सारताज, ब्रिगेडियर मोहम्मद फुरकान शब्बीर, पंजाब पोलिस महानिरीक्षक डॉ . उस्मान अन्वर, पंजाब प्रांताचे संसद सदस्य मलिक शोएब अहमद यांची नावे सामील आहेत. पहलगाम हल्ल्यानंतर भारताने केलेल्या कारवाईमुळे पाकिस्तानचा खरा चेहरा आता जगासमोर आला आहे.
दहशतवाद्यांच्या शवपेट्यांवर पाकिस्तानी ध्वज!
दहशतवाद्यांना ठार मारल्यानंतर लष्कर-ए-तोयबाचा मुख्य हाफिज अब्दुल रौफ शोक व्यक्त करताना दिसला होता. भारतीय सैन्याने लाहोरजवळील मुरिदके येथील दहशवाद्यांच्या तळावर हल्लाबोल केला होता. यामध्ये अनेक दहशतवादी मारले गेले. याचे काही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. या व्हिडीओंमध्ये दहशतवाद्यांच्या शवपेट्या पाकिस्तानी ध्वजाने झाकलेल्या दिसत होत्या. इतकंच नाही तर, पाकिस्तान सैन्यानेच या शवपेट्यांना खांदा दिला होता. पाकिस्तान ज्याप्रकारे या दहशतवाद्यांना सन्मान देत होते, याचे दृश्य पाहून जगभरातून संताप व्यक्त केला जात होता.
अमेरिकेने केला हस्तक्षेप
पाकिस्तान दहशतवाद्यांना आश्रय देतो, हे आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर मान्य करण्यास तयार होत नसला तरी, त्याचे सत्य अनेकदा अशाप्रकारे समोर येते. भारताने दहशतवादी तळांवर केलेल्या हल्ल्यांनंतर पाकिस्तान इतका संतापला की, त्यांनी भारतावर क्षेपणास्त्रे आणि ड्रोन्स डागण्यास सुरुवात केली. मात्र, भारताने देखील या सगळ्या हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर दिले. चार दिवस चाललेल्या या संघर्षात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हस्तक्षेप करत युद्धविराम घडवून आणला.