पठाणकोट : भारताच्या सीमारेषेवर केवळ दहशतवादीच घुसखोरी करत नाहीत, तर पाकिस्तानी नागरिकही घुसखोरी करून शेतामध्ये काम करणाऱ्या शेतकऱ्यांना मारहाण करत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. महत्वाचे म्हणजे या शेतकऱ्याला पाकिस्तानच्या हद्दीत ओढत नेण्याचाही प्रयत्न झाला आहे.
पठाणकोटमधील बमियालभगातील खुदाईपुर या गावात हा प्रकार घडला आहे. शेतकरी सुखबीर सिंह लक्खा त्याच्या सीमेलगतच्या शेतात काम करत होता. यावेळी अचानक पाकिस्तानी नागरिक तेथे आला. त्याने सुखबीरना मारहाण करण्यास सुरुवात केली. तसेच त्यांना ओढत पाकिस्तानच्या हद्दीत नेण्याचा प्रयत्न झाला. यावेळी सुखबीर यांनी आरडाओरडा केल्याने आजुबाजुच्या शेतात काम करणारे शेतकरी त्यांना वाचविण्यासाठी धावले. हे पाहून पाकिस्तानी नागरिक पळून गेला. त्याच्यासोबत अन्य तीन जण शस्त्रांसह होते, असे सांगितले जात आहे. हे सर्वजण पाकिस्तानी रेंजर पोस्टच्या दिशेने गेले. हा धक्कादायक प्रकार पाकिस्तानी रेंजरकडूनच केल्याची शंका उपस्थित केली जात आहे.
आंतरराष्ट्रीय सीमेवर सुखबीर जनावरांसाठी चारा आणण्यासाठी गेला होता. सकाळी 10.30 च्या सुमारास पाकिस्तानी व्यक्तीकडून तीन-4 मिनिटे मारहाण करण्यात आली. यानंतर त्याला पाकिस्तानच्या सीमेवर ओढत नेले जात होते. सीमेपलिकडे तीन जण लष्करी गणवेशात बंदूक घेऊन उभे असल्याचे सुखबीरने पाहिले. लोकांना येताना पाहून या व्यक्तीने ढकलत पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केला.