पाक नरमला...! शांततेची संधी द्या!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2019 05:30 IST2019-02-26T05:30:09+5:302019-02-26T05:30:26+5:30
वाढला आंतरराष्ट्रीय दबाव; कडक कारवाईसाठी दिला सज्जड दम

पाक नरमला...! शांततेची संधी द्या!
इस्लामाबाद/नवी दिल्ली : पुलवामा हल्ल्याच्या कारस्थानाचे प्रकरण अंगाशी येत असल्याचे पाहून, पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी आपली आतापर्यंतची ‘भारताला जशास तसे उत्तर दिले जाईल’ ही भूमिका बाजूला सारून, दोन्ही देशांनी शांततेसाठी प्रयत्न करू, असे मवाळ धोरण स्वीकारले आहे. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दोन्ही बाजूंनी शांततेचे आवाहन करतानाच, त्या हल्ल्यात पाकिस्तानचा हात असल्याचे पुरावे दिल्यास आपण नक्की कारवाई करू, असे आश्वासनही दिले आहे.
आतापर्यंत पुलवामा हल्ल्याशी पाकिस्तानचा अजिबात संबंध नाही, असाच दावा इम्रान खान करीत आले. भारतात होणाऱ्या लोकसभा निवडणुकांसाठी या हल्ल्याचा फायदा करून घेतला जात असल्याची टीकाही त्यांनी केली होती. आता मात्र, आंतरराष्ट्रीय दबावामुळेच इम्रान खान यांनी शांततेची भाषा सुरू केली आहे. भारताने हल्ला करू नये, यासाठीच इम्रान खान यांनी शांततेची भाषा सुरू केल्याचे दिसत आहे.
त्यातच पाकिस्तानने भारतावर एक अणुबॉम्ब टाकला, तर भारत २० अणुबॉम्ब टाकून पाकिस्तान बेचिराख करेल. तसे होऊ द्यायचे नसेल, तर आपल्याला आधी ५० अणुबॉम्ब टाकावे लागतील, असे सांगत, तशी पाकिस्तानची तयारी आहे का? असा सवाल पाकिस्तानचे माजी अध्यक्ष व लष्करशहा परवेझ मुशर्रफ यांनी विचारला आहे.
अर्थात, आता अणुयुद्धाची शक्यता नाही, असे तेही म्हणाले असले, तरी पाकिस्तानची भीती त्यातून स्पष्टपणे दिसू लागली आहे. पुलवामा हल्ल्यात पाकचा हात असल्याचे पुरावे एनआयएच्या हाती लागले आहेत. दुसरीकडे अमेरिकेसह सर्वच देश पाकिस्तानवर (पान ९ वर)
आरडीएक्स आणले कुठून याचा शोध सुरू
पुलवामा हल्ल्यासाठी पाकिस्तानातूनच आरडीएक्स आणले होते, असे एनआयएच्या तपासातून आढळून आले आहे. कोणत्या मार्गाने काश्मीरमध्ये ते आणले, याचा शोध सुरू आहे. ज्या कारमध्ये आरडीएक्स ठेवण्यात आले होते, त्या कारचा मालक सज्जाद भट्ट आहे, हेही एनआयएने शोधून काढले आहे. तो फरार आहे. मात्र, पाकिस्तानातील जैश-ए-मोहम्मदचा हल्ल्यात थेट सहभाग होता आणि त्यांनीच सुसाइड बॉम्बर आदिल दार याचे माथे भडकावले होते व त्याच्याबरोबरच आणखी पाच ते सहा अतिरेकी या कटात सहभागी होते, असेही तपासात आढळून आले आहे.