नवी दिल्ली - पाकिस्तानसोबतच्या संबंधांवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुलाखतीत केलेल्या विधानानं पाकला मिरची झोंबली आहे. मोदींचे विधान एकतर्फी असून दिशाभूल करणारे असल्याची प्रतिक्रिया पाकिस्ताननं एक दिवसाआधी दिली. त्यावरून आता भारतानेही पाकिस्तानला सडेतोड उत्तर देत भारताच्या भागावरील अवैध कब्जा रिकामा करा असा इशारा दिला आहे.
भारताच्या परराष्ट्र खात्याचे प्रवक्ते रणधीर जायसवाल यांनी अधिकृतपणे निवेदन जारी करत म्हटलंय की, प्रादेशिक शांतता आणि सुरक्षेत पाकिस्तान सर्वात मोठा अडथळा आहे. पाकिस्तानने अवैध आणि बळजबरीनं कब्जा केलेला भारताचा भूभाग रिकामा करावा. पाकिस्तानने पुन्हा एकदा भारतातील जम्मू काश्मीर राज्याबाबत काही टिप्पणी केल्याचं ऐकलं. खरा मुद्दा पाकिस्तानकडून सीमेपलीकडे दहशतवादाला खतपाणी देणे हा आहे हे जगाला माहिती आहे. वास्तविक हाच मुद्दा शांतता आणि सुरक्षेसाठी अडथळा आहे असं त्यांनी सांगितले.
भारताची प्रतिक्रिया अशावेळी आली आहे जेव्हा अमेरिकन इंटेलिजेंस चीफ तुलसी गबार्ड यांनी एका मुलाखतीत पाकिस्तानी पुरस्कृत हल्ल्यावरील प्रश्नाला उत्तर दिले. इस्लामिक दहशतवाद हा असा धोका आहे, ज्याने भारत आणि अमेरिकेसह मध्य पूर्व देशातील अनेकांचे नुकसान केले आहे असं गबार्ड यांनी म्हटलं. तुलसी गबार्ड यांच्या मुलाखतीत मोदींनीही भारत आणि अमेरिका दहशतवादाचा सामना करण्यासाठी आणि सागरी, सायबर सुरक्षेसाठी सहकार्य करण्यासाठी कटिबद्ध आहे असं सांगितले.
काय होता पाकिस्तानचा आरोप?
पाकिस्तानी परराष्ट्र खात्याने सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींचं विधान एकतर्फी असल्याचं म्हणत जम्मू काश्मीर वादग्रस्त मुद्दा असल्याचं म्हटलं. जम्मू काश्मीरचा ७ दशकाचा जुना वाद भारताच्या संयुक्त राष्ट्र, पाकिस्तान आणि काश्मिरी लोकांना दिलेल्या आश्वासनानंतरही सोडवला गेला नाही असा आरोप त्यांनी केला.
नरेंद्र मोदींनी मुलाखतीत काय म्हटलं?
अमेरिकन पॉडकास्टर लेक्स फ्रिडमॅन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची मुलाखत घेतली. त्यात भारत पाकिस्तान संबंधांवर मोदींनी पाकला फटकारले. भारताकडून शांततेसाठी करण्यात आलेला प्रत्येक प्रयत्न शत्रुता आणि विश्वासघाताने अयशस्वी केला. कुठेही दहशतवादी हल्ला झाला तरी त्याचे धागेदोरे पाकिस्तानशी जोडले जातात. भारत शांततेसाठी वचनबद्ध आहे. पाकिस्तानला सुबुद्धी मिळेल अशी अपेक्षा आहे. पाकिस्तानातील लोकांनाही शांतता हवी, कारण तेदेखील संघर्ष, अशांतता आणि दहशतीच्या वातावरणाला कंटाळले आहेत असं मोदींनी म्हटलं होते.