लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली: युद्धात पराभव झाला असतानाही आपला विजय झाल्याचे ढोल वाजविणे ही पाकिस्तानची जुनी सवय आहे. ऑपरेशन सिंदूरनंतर आता जगासमोर आलेले नवे वास्तव स्वीकारणे हे पाकिस्तानच्याच भल्याचे ठरणार आहे, असे भारताने मंगळवारी ठणकावले आहे. पाकिस्तानने काश्मीरचा बळकाविलेला भूभाग भारताला परत करावा ही आमची मागणी असून त्यासाठी प्रयत्न करणार आहोत, असेही भारताने बजावले.
भारताच्या परराष्ट्र खात्याचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी सांगितले की, काश्मीरच्या प्रश्नावर द्विपक्षीय चर्चेतूनच तोडगा काढावा, अशी भारताची भूमिका आहे. त्यात बदल झालेला नाही. काश्मीर प्रश्नावर मध्यस्थी करण्याचा नवा प्रस्ताव अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ठेवला. त्या पार्श्वभूमीवर जयस्वाल यांनी हे उत्तर दिले. त्यांनी सांगितले की, अण्वस्त्र हल्ल्यांच्या दिल्या जाणाऱ्या धमक्यांना भारत भीक घालणार नाही. अशा धमक्यांचा वापर करून केल्या जाणाऱ्या दहशतवादी कारवायादेखील भारत सहन करणार नाही.
त्या कालावधीत अमेरिकेशी व्यापार चर्चा झालीच नाही
ऑपरेशन सिंदूरला ७ मे रोजी सुरुवात झाली. त्यानंतर १० मे रोजी भारत व पाकिस्तानने शस्त्रसंधीचा निर्णय घेतला. या कालावधीत भारत व अमेरिकेत लष्करी कारवाई, व संबंधित विषयांवर चर्चा झाली. मात्र, व्यापाराचा विषय कधीच उपस्थित करण्यात आला नाही, असे जयस्वाल म्हणाले. जोपर्यंत पाकिस्तान दहशतवादाला पाठिंबा देण्याचे धोरण कायम ठेवेल तोवर सिंधू जल कराराला भारताने दिलेली स्थगितीही कायम राहील.
हा तर भारताचा स्पष्ट विजय : कूपर
ऑस्ट्रियन लष्करी इतिहासकार टॉम कूपर यांनी ऑपरेशन सिंदूर कारवाई म्हणजे भारताचा स्पष्ट विजय आहे, असे म्हटले आहे. भारत-पाक संघर्षाचे विश्लेषण करताना कूपर यांनी ब्लॉग पोस्टमध्ये पाश्चात्य माध्यमांवर टीका केली. आपण जेव्हा दुसऱ्याच्या अण्वस्त्र साठवणुकीच्या सुविधांवर बॉम्बस्फोट करीत असतो आणि दुसऱ्या बाजूकडे प्रत्युत्तर देण्याचीही क्षमता नसते, हा माझ्या लेखी स्पष्ट विजय आहे, असे ते म्हणाले.