पाकिस्तानने अटारी, वाघा बॉर्डरचे गेट उघडले; धास्ती एवढी की पाकिस्तानींनाही घेत नव्हते...
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2025 12:03 IST2025-05-02T12:03:01+5:302025-05-02T12:03:19+5:30
India Vs Pakistan War: जम्मू काश्मीरमध्ये पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानी नागरिकांना देश सोडून जाण्यास सांगितले होते. स्वत:हून जाण्याची मुदत २७ एप्रिलला संपली होती.

पाकिस्तानने अटारी, वाघा बॉर्डरचे गेट उघडले; धास्ती एवढी की पाकिस्तानींनाही घेत नव्हते...
भारत-पाकिस्तानच्या तणावाच्या पार्श्वभूमीवर एलओसीवरून मोठी अपडेट येत आहे. पाकिस्तानने गेल्या काही दिवसांपासून बंद केलेले अटारी, वाघा बॉर्डरचे गेट पुन्हा उघडले आहे. पाकिस्तान भारताने देश सोडून जा असे सांगितलेल्या पाकिस्तानी नागरिकांना आपल्या देशात घेण्याचे देखील बंद केले होते. आता सीमेवरच ताटकळलेले नागरिक त्यांच्या देशात जाऊ लागले आहेत.
जम्मू काश्मीरमध्ये पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानी नागरिकांना देश सोडून जाण्यास सांगितले होते. स्वत:हून जाण्याची मुदत २७ एप्रिलला संपली होती. यानंतर राज्या राज्याच्या पोलिसांनी अधिकृतरित्या आलेल्या पाकिस्तानी नागरिकांना शोधून बसमध्ये बसवून भारत पाक सीमेवर आणून सोडण्याची व्यवस्था केली आहे. हे नागरिक अटारी आणि वाघा सीमेवर येत आहेत. परंतू, पाकिस्तानने गेट बंद केल्याने त्यांना त्यांच्या देशात जाता येत नव्हते. तोवर भारतीय सैनिक, प्रशासन त्यांची अन्न पाण्याची सोय करत होते.
पाकिस्तानने सीमेवर सलग आठव्या दिवशी शस्त्रसंधीचे उल्लंघन केले आहे. भारताने या पाकिस्तानी नागरिकांचे सर्व प्रकारचे व्हिसा रद्द केले आहेत. यामुळे हे नागरिक ना घर का ना घाटका अशाच अवस्थेत एलओसीवर अडकलेले होते. भारताने कळविल्यानंतर पाकिस्तानकडून गेले २४ तास काहीच उत्तर आले नाही. पाकिस्तानने काहाही न कळविता आज शुक्रवारी अटारी-वाघा सीमा दरवाजे पुन्हा उघडले आहेत.
गुरुवारपर्यंत बॉर्डर बंद ठेवण्यात आली होती. अनेक पाकिस्तानी नागरिक भारतीय सीमेत अडकले होते. पाकिस्तानी पासपोर्ट असलेले लोक इमिग्रेशन काउंटरकडे जात आहेत. परंतू, भारतीय पासपोर्ट धारकांनी पाकिस्तानी नागरिकाशी लग्न केले असले तरीही त्यांना पाकिस्तानात प्रवास करण्याची परवानगी नाही. यामुळे अनेक महिला लहान मुलांना घेऊन सीमेवरच अडकलेल्या आहेत. यांची मुले पाकिस्तानी पासपोर्ट धारक आहेत, यामुळे त्यांना भारतात राहण्याची परवानगी नाही.