सुरेश एस. डुग्गर, लोकमत न्यूज नेटवर्क, जम्मू : पाकिस्तान व भारतात शस्त्रसंधी केल्याला एकच रात्र उलटली असली तरी आजवर भारतीय जनता त्या देशाच्या मौखिक समझोत्याबाबत साशंक आहे. कारण इतिहासात पाकने मौखिक किंवा लिखित कोणत्याच समझोत्याचे कधीही पालन केलेले नाही. त्याच कारणामुळे जम्मू-काश्मीरमध्ये सध्याही युद्धाच्या तयारीत कोणतीही कमी झालेली नाही.
एका लष्कराधिकाऱ्याने सांगितले की, पाकिस्तान समझोते पाळत नसल्यामुळे भारताला आतापर्यंत कठोर पावले उचलावी लागली आहेत.
१९९९ : कारगिल युद्ध होण्यापूर्वी कोणताच देश भीषण थंडीतील बर्फवृष्टी व हवामानाच्या स्थितीमुळे रिकाम्या होणाऱ्या चौकीवर ताबा मिळविणार नाही, असा समझोता होता; परंतु पाकच्या सैन्याने असा समझोता कधीही मानलाच नाही. त्याचा परिणाम म्हणजे कारगिल युद्ध झाले.
१९८४ : एप्रिल महिन्यात भारतीय सैन्याला जगातील सर्वांत दुर्गम व उंच युद्धस्थळ सियाचीन ग्लेशियरवरही याचमुळे तळ ठोकावा लागला. कारण पाकने समझोत्यांचे उल्लंघन करत याच्या अनेक भागांवर आपले सैन्य पाठवण्यास प्रारंभ केला होता. याच कारणामुळे भारताने १९९९ च्या कारगिल युद्धानंतर एलओसीवरील कोणतीही दुर्गम सीमा चौकी भीषण थंडीच्या काळातही रिकामी ठेवण्यास नकार दिला. त्यामुळे आजही कारगिलच्या दुर्गम पर्वतराजींमध्ये शून्य ते ४० अंशांच्या तापमानातही सैन्याचे जवान पाकिस्तानी लष्कराच्या समोर निधड्या छातीने उभे असतात.
१९९५ : जम्मू सीमेवर तारांचे कुंपण घालण्यास सुरुवात झाली तेव्हा पाक रेंजर्सनी अर्ध्या तासांतच समझोता तोडून गोळीबार करण्यास बीएसएफला मजबूर केले होते. त्यामुळे पाकला त्याच्याच भाषेत उत्तर द्यावे लागले. कुंपण घालण्याच्या कालावधीत कितीदा तरी पाक रेंजर्स व पाक सैन्याने मौखिक व लिखित समझोता तोडला होता, याची गणती करणेही अवघड आहे.
२०२५ : आता ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भयानक नुकसान झाल्यानंतर पाकशी झालेली युद्धबंदी किती दिवस टिकेल, याची शंका सर्वांच आहे कारण काल रात्रीच तीन तासांनंतर युद्धबंदीचे उल्लंघन केले.