Pakistan knew we could wipe out their bases says ex IAF chief bs dhanoa on Abhinandan release | अभिनंदन यांची सुटका झाली नसती तर...; हवाई दलानं सांगितली काय होती रणनीती

अभिनंदन यांची सुटका झाली नसती तर...; हवाई दलानं सांगितली काय होती रणनीती

नवी दिल्ली: पुलवामात सीआरपीएफच्या ताफ्यावर झालेल्या हल्ल्यात ४० जवान शहीद झाले. यानंतर भारतानं पाकव्याप्त काश्मीरमध्ये एअर स्ट्राईक केला. मात्र भारताकडून करण्यात आलेल्या एअर स्ट्राईकवर पाकिस्ताननं कायमच प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. मात्र आता पाकिस्तानच्या संसदेतच याबद्दलचा गौप्यस्फोट झाला आहे. भारताच्या एअर स्ट्राईकनंतर पाकिस्तानला थेट हल्ल्याची भीती वाटत होती, असं पाकिस्तानच्या संसदेचे माजी अध्यक्ष अयाज सादिक यांनी म्हटलं आहे. त्यामुळे पाकिस्तानची पोलखोल झाली आहे. 

अयाज सादिक यांच्या विधानावर माजी हवाई दल प्रमुख बी. एस. धनोआ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. बालाकोट एअर स्ट्राईक झाला, त्यावेळी धनोआ हवाई दलाचे प्रमुख होते. 'आम्ही अभिनंदनला माघारी आणू असा शब्द मी त्याच्या वडिलांना दिला होता. आम्हाला १९९९ ची घटना माहीत होती. त्यावेळी पाकिस्ताननं शेवटच्या क्षणी आमचा विश्वासघात केला होता. त्यामुळेच आम्ही सतर्क होतो,' असं धनोआ यांनी सांगितलं. विशेष म्हणजे धनोआ यांनी अभिनंदनच्या वडिलांसोबत काम केलं आहे. "पाक लष्करप्रमुखांचे पाय थरथर कापत होते, घाम फुटला होता, हल्ल्याच्या भीतीनं अभिनंदनला सोडलं"

भारतीय हवाई दलाची विमानं नेमकी कुठे तैनात आहेत, ती कुठून कुठपर्यंत उड्डाणं करू शकतात आणि किती आक्रमकपणे हल्ले करू शकतात, याची कल्पना पाकिस्तानला होती, म्हणूनच तेव्हा पाकिस्तानची गलितगात्र झाली होती, असं धनोआ यांनी सांगितलं. भारतीय हवाई दलाच्या पोझिशन्स अतिशय आक्रमक होत्या. आम्ही पाकिस्तानच्या फॉरवर्ड पोस्ट सहज उद्ध्वस्त करू शकत होतो. याशिवाय बालाकोट एअर स्ट्राईकनंतर पाकिस्तानवर मोठा दबाव होता. आपण मर्यादा ओलांडली, तर परिणामांचा सामना करावा लागेल, याची कल्पना त्यांना होती, असं धनोआ म्हणाले.

पुलवामा हल्ला, भारताचा एअर स्ट्राईक अन् अभिनंदन यांची सुटका
फेब्रुवारी २०१९ मध्ये पुलवामात सीआरपीएफच्या ताफ्यावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात ४० जवान शहीद झाले. त्यानंतर भारतानं पाकव्याप्त काश्मीरमधील बालकोटवर हवाई हल्ले केले. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी पाकिस्तानी हवाई दलाची विमानं भारतीय हद्दीत घुसली. त्यांना पिटाळून लावण्यासाठी भारतीय हवाई दलाची विमानं झेपावली. यावेळी भारताचं मिग विमान पाकिस्तानच्या हद्दीत कोसळलं आणि विंग कमांडर अभिनंदन पाकिस्तानच्या हाती लागले. त्यांची ४८ तासांत सुटका करण्यात भारताला यश आलं. अभिनंदन यांनी हवाई चकमकीत पाकिस्तानचं एफ-१६ हे अत्याधुनिक लढाऊ विमानं जमीनदोस्त केलं होतं.

एअर स्ट्राईकनंतर पाकिस्तानात काय घडलं?
भारताच्या एअर स्ट्राईकनंतर पाकिस्तानमधील परिस्थिती काय होती, याची माहिती संसदेचे माजी अध्यक्ष अयाज सादिक यांनी दिली आहे. भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी अयाज सादिक यांचा एक व्हिडीओ ट्विट केला आहे. 'भारत हल्ला करेल या भीतीनं तेव्हा पाकिस्तानचे लष्करप्रमुख कमर जावेद बाजवा यांचे पाय कापत होते. त्यांच्या चेहऱ्यावर घाम अगदी स्पष्ट दिसत होता. बाजवा यांना भारताच्या हल्ल्याची भीती वाटत होती,' असं सादिक संसदेत बोलताना दिसत आहेत. या बैठकीला परराष्ट्रमंत्री महमूद शाह कुरेशी उपस्थित होते, अशी माहितीही सादिक यांनी दिली. 'कुरेशी त्या बैठकीला उपस्थित असल्याचं मला आठवतं. त्या बैठकीला हजर राहण्यास पंतप्रधान इम्रान खान यांनी नकार दिला होता. कुरेशी यांचे पाय कापत होते. त्यांना घाम फुटला होता. अभिनंदन यांची सुटका करा. अन्यथा भारत हल्ला करेल, असं आम्ही कुरेशी यांनी म्हटलं होतं,' असं सादिक यांनी संसदेला सांगितलं. भारताकडून हल्ला होण्याच्या भीतीनं पाकिस्ताननं विंग कमांडर अभिनंदन यांची सुटका केल्याचं पाकिस्तानचे माजी परराष्ट्र मंत्री ख्याजा मोहम्मद आसिफ यांनी संसदेत म्हटलं. 'पाकिस्तानचं सरकार प्रचंड घाबरलं होतं. त्यामुळे त्यांनी जराही वेळ न घालवता अभिनंदन यांच्या सुटकेचा निर्णय घेतला. त्यांनी भारतासमोर गुडघे टेकले. भारताला खूष करण्यासाठी अभिनंदन यांची सुटका करण्यात आली,' असं आसिफ म्हणाले.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Pakistan knew we could wipe out their bases says ex IAF chief bs dhanoa on Abhinandan release

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.