COAS Bajwas legs were shaking Pakistan MP recalls why IAF pilot Abhinandan Varthaman was released | "पाक लष्करप्रमुखांचे पाय भीतीनं थरथर कापत होते, घाम फुटला होता, हल्ल्याच्या भीतीनं अभिनंदनला सोडलं"

"पाक लष्करप्रमुखांचे पाय भीतीनं थरथर कापत होते, घाम फुटला होता, हल्ल्याच्या भीतीनं अभिनंदनला सोडलं"

नवी दिल्ली: पुलवामात सीआरपीएफच्या ताफ्यावर झालेल्या हल्ल्यात ४० जवान शहीद झाले. यानंतर भारतानं पाकव्याप्त काश्मीरमध्ये एअर स्ट्राईक केला. मात्र भारताकडून करण्यात आलेल्या एअर स्ट्राईकवर पाकिस्ताननं कायमच प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. मात्र आता पाकिस्तानच्या संसदेतच याबद्दलचा गौप्यस्फोट झाला आहे. भारताच्या एअर स्ट्राईकनंतर पाकिस्तानमधील परिस्थिती काय होती, याची माहिती संसदेचे माजी अध्यक्ष अयाज सादिक यांनी दिली आहे.

भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी अयाज सादिक यांचा एक व्हिडीओ ट्विट केला आहे. 'भारत हल्ला करेल या भीतीनं तेव्हा पाकिस्तानचे लष्करप्रमुख कमर जावेद बाजवा यांचे पाय कापत होते. त्यांच्या चेहऱ्यावर घाम अगदी स्पष्ट दिसत होता. बाजवा यांना भारताच्या हल्ल्याची भीती वाटत होती,' असं सादिक संसदेत बोलताना दिसत आहेत. या बैठकीला परराष्ट्रमंत्री महमूद शाह कुरेशी उपस्थित होते, अशी माहितीही सादिक यांनी दिली. 'कुरेशी त्या बैठकीला उपस्थित असल्याचं मला आठवतं. त्या बैठकीला हजर राहण्यास पंतप्रधान इम्रान खान यांनी नकार दिला होता. कुरेशी यांचे पाय कापत होते. त्यांना घाम फुटला होता. अभिनंदन यांची सुटका करा. अन्यथा भारत हल्ला करेल, असं आम्ही कुरेशी यांनी म्हटलं होतं,' असं सादिक यांनी संसदेला सांगितलं. भारताकडून हल्ला होण्याच्या भीतीनं पाकिस्ताननं विंग कमांडर अभिनंदन यांची सुटका केल्याचं पाकिस्तानचे माजी परराष्ट्र मंत्री ख्याजा मोहम्मद आसिफ यांनी संसदेत म्हटलं. 'पाकिस्तानचं सरकार प्रचंड घाबरलं होतं. त्यामुळे त्यांनी जराही वेळ न घालवता अभिनंदन यांच्या सुटकेचा निर्णय घेतला. त्यांनी भारतासमोर गुडघे टेकले. भारताला खूष करण्यासाठी अभिनंदन यांची सुटका करण्यात आली,' असं आसिफ म्हणाले.

पाकिस्तानचे खासदार अयाज सादिक यांचा व्हिडीओ ट्विट करत भाजप प्रवक्ते संबित पात्रांनी काँग्रेस नेते राहुल गांधींवर निशाणा साधला आहे. 'राहुलजी, तुम्ही सर्जिकल स्ट्राईक आणि एअर स्ट्राईकवर प्रश्न उपस्थित करत होतात ना? जरा पाहा पाकिस्तानाला मोदींची किती भीती वाटते. पाकिस्तानी लष्करप्रमुखांचे पाय कापत होते. चेहऱ्यावर घाम होता. भारत हल्ला तर करणार नाही ना याची भीती त्यांना वाटत होती, असं पाकिस्तानी संसदेत सरदार अयाज सादिक बोलत आहेत. समजलं का?,' असं पात्रांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

Read in English

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: COAS Bajwas legs were shaking Pakistan MP recalls why IAF pilot Abhinandan Varthaman was released

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.