'पाकिस्तान अजूनही डंपर, असीम मुनीरनेही कबूल केले', राजनाथ सिंह यांनी मर्सिडीजच्या विधानाची खिल्ली उडवली
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2025 19:44 IST2025-08-22T19:25:37+5:302025-08-22T19:44:53+5:30
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी पाकिस्तानी लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर यांच्या विधानावर टीका केली. पाकिस्तान अजूनही डंपरच्या स्थितीत असताना भारताने कठोर परिश्रमाने फेरारीसारखी अर्थव्यवस्था उभारली आहे, असंही ते म्हणाले.

'पाकिस्तान अजूनही डंपर, असीम मुनीरनेही कबूल केले', राजनाथ सिंह यांनी मर्सिडीजच्या विधानाची खिल्ली उडवली
भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर यांनी काही दिवसापूर्वी मर्सिडीजच्या केलेल्या विधानावर टीका केली. मुनीर यांच्या विधानामुळे पाकिस्तान जगभरात ट्रोल झाला आहे.
'भारत हा महामार्गावर धावणारी मर्सिडीज कार आहे आणि पाकिस्तान हा खडी भरलेला डंपर ट्रक आहे', असं असीम मुनीर म्हणाले होते. या विधानावर टीका करताना राजनाथ सिंह म्हणाले की, दोन देशांना एकत्र स्वातंत्र्य मिळाले आणि एकाने कठोर परिश्रम, योग्य धोरणे आणि दूरदृष्टीने फेरारीसारखी अर्थव्यवस्था निर्माण केली, तर दुसरा देश अजूनही डंपरच्या स्थितीत आहे. हे पाकिस्तानचे स्वतःचे अपयश आहे, असा टोलाही राजनाथ सिंह यांनी लगावला.
चीनची मोठी तयारी! या देशाविरोधात लढणार,समुद्रात १४ लढाऊ जहाजे उतरवले; लष्कर हाय अलर्टवर
राजनाथ सिंह म्हणाले की, पाकिस्तानच्या लष्करप्रमुखांनी जाणूनबुजून किंवा अजाणतेपणे लुटारू मानसिकते'कडे लक्ष वेधले आहे, ज्याचा पाकिस्तान त्याच्या जन्मापासूनच बळी पडला आहे.
राजनाथ सिंह म्हणाले, आपल्याला हे सुनिश्चित करावे लागेल की भारताची समृद्धी, संस्कृती आणि आपली आर्थिक संपत्ती, आपल्या संरक्षण क्षमता आणि आपल्या राष्ट्रीय सन्मानासाठी आपली लढाऊ भावना तितकीच मजबूत राहील.
असीम मुनीर यांचे विधान
अमेरिकेच्या दौऱ्यात मुनीर यांनी फ्लोरिडामध्ये पाकिस्तानी वंशाच्या लोकांना संबोधित करताना भारत आणि पाकिस्तानमधील संबंधांबद्दल बोलताना एक विचित्र उदाहरण दिले.
त्यांनी म्हटले होते की, भारताला महामार्गावर धावणारी मर्सिडीज समजा, तर पाकिस्तान म्हणजे खडी भरलेला डंप ट्रक. आता विचार करा जर हा ट्रक मर्सिडीजशी टक्करला तर प्रत्यक्षात नुकसान कोणाचे होईल.
सौदीमध्येही हेच विधान
काही दिवसापूर्वी सौदीमध्येही पाकिस्तानचे गृहमंत्री मोहसीन यांनी हेच विधान केले होते. त्यांनी खुल्या व्यासपीठावर ते पुन्हा सांगितले आणि म्हणाले की, भारतासोबतचा तणाव वाढल्यानंतर सौदीने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला, तेव्हाही मुनीर यांनी तेच म्हटले होते की भारत हा मर्सिडीज आहे आणि पाकिस्तान हा खडी भरलेला ट्रक आहे.