पाकिस्तानने एलओसीजवळील सैनिकांची तैनाती वाढवली, सूत्रांची माहिती
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2019 22:51 IST2019-03-06T22:51:23+5:302019-03-06T22:51:50+5:30
एकीकडे आपल्याला युद्ध नको असल्याचा आव आणणाऱ्या पाकिस्तानने नियंत्रण रेषेजवळ मात्र वेगळीच कारस्थाने सुरू केली आहेत.

पाकिस्तानने एलओसीजवळील सैनिकांची तैनाती वाढवली, सूत्रांची माहिती
नवी दिल्ली - एकीकडे आपल्याला युद्ध नको असल्याचा आव आणणाऱ्या पाकिस्तानने नियंत्रण रेषेजवळ मात्र वेगळीच कारस्थाने सुरू केली आहेत. नियंत्रण रेषेवरील शस्त्रसंधीचे उल्लंघन ही नित्याचीच बाब झालेली असताना आता पाकिस्तानने नियंत्रण रेषेवरील सैन्याची तैनातीही वाढवली आहे. तसेच संवेदनशील भागामध्ये दारुगोळ्याचाही मोठ्या प्रमाणावर साठा करण्यात येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार पाकिस्तानने अफगाणिस्तानच्या सीमेवरील आपल्या सैन्याच्या तैनातीमध्ये मोठ्या प्रमाणावर कपात करून त्यांना एलओसीवर पाठवण्यास सुरुवात केली आहे. तसेच दारुगोळ्याचा साठाही वाढवण्यात येत आहे.
दरम्यान, दोन्ही देशांमध्ये असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारतीय लष्कराने पाकिस्तानला सक्त इशारा दिला आहे. भारत आणि पाकिस्तानच्या दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये हॉटलाइनवरून चर्चा झाली होती त्यावेळी पाकिस्तानला हे खडेबोल सुनावण्यात आले. '' पाकिस्तानने एलओसीजवळ राहत असलेल्या नागरिकांना लक्ष्य करू नये, तसे झाल्यास पाकिस्तानला गंभीर परिणाम भोगावे लागतील,'' असे लष्कराने पाकिस्तानला सुनावले आहे.
पाकिस्तानकडून नौशेरा विभागात 155 एमएम आर्टिलगी गनच्या सहाय्याने मोठ्या प्रमाणात गोळीबार करण्यात आला होता. त्यानंतर भारतील लष्कराकडूनही बोफोर्स गनच्या मदतीने त्याला चोख प्रत्युत्तर देण्यात आले होते.